टी20 विश्वचषकाचा तिसरा सामना नामिबिया आणि ओमान यांच्यात बार्बाडोसमध्ये खेळला गेला. हा सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना ओमाननं 109 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, नामिबियाचा संघही केवळ 109 धावाच करू शकला. यानंतर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आला, ज्यामध्ये नामिबियानं विजय मिळवला.
या सामन्यात नामिबायाचा वेगवान गोलंदाज रुबेन ट्रम्पेलमननं इतिहास रचला आहे. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट घेणारा रुबेन जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. रुबेननं ओमानविरुद्ध डावाच्या पहिल्याच चेंडूवर कश्यप प्रजापतीला एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्यानं अकीब इलयासला पण एलबीडब्ल्यू केलं.
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीन गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहे. बांगलादेशच्या मशरफी मोर्तझानं 2014 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. असं करणारा तो जगातील पहिला गोलंदाज होता. त्याच्यानंतर त्याच वर्षी अफगाणिस्तानच्या शापूर जद्राननं हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेतली.
टी20 विश्वचषकात सामन्यातील पहिल्या चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज
मशरफी मोर्तझा विरुद्ध अफगाणिस्तान, 2014
शापूर झद्रान विरुद्ध हाँगकाँग, 2014
रुबेन ट्रम्पेलमन विरुद्ध स्कॉटलंड, 2021
रुबेन ट्रम्पेलमन विरुद्ध ओमान, 2024
रुबेन ट्रम्पलमननं पॉवरप्लेमध्ये तीन विकेट घेण्याची टी20 विश्वचषकातील ही दुसरी वेळ आहे. पॉवरप्लेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा तीन किंवा अधिक बळी घेणारा तो डर्क नॅनिस, अँजेलो मॅथ्यूज आणि ट्रेंट बोल्ट यांच्यानंतर चौथा गोलंदाज ठरला. रुबेननं ओमान विरुद्ध पहिल्या 2 षटकात 7 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तर त्याआधी 2021 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत त्यानं स्कॉटलंड विरुद्ध पहिल्या षटकात 2 धावा देऊन 3 बळी घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकात 12 वर्षांनंतर सुपर ओव्हरचा थरार! नामिबियाचा ओमानवर रोमहर्षक विजय
चेंडू चुकून लागल्यानंतर गोलंदाजानं बाद केलं नाही, अशी खिलाडूवृत्ती क्रिकेटमध्येच दिसते! पाहा VIDEO
साहेबांच्या खेळात भारतीयांची मक्तेदारी! टी20 विश्वचषकात दुसऱ्या देशाकडून खेळणारे भारतीय वंशाचे क्रिकेटपटू