ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने पार पडले असून ब्रिस्बेन येथे शुक्रवारपासून (१५ जानेवारी) चौथा आणि निर्णायक कसोटी सामना चालू आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याच्यासाठी खूप विशेष ठरला आहे.
३३ वर्षीय गोलंदाज लायन याचा हा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना आहे. यानिमित्ताने भारताविरुद्धचा चौथा कसोटी सामना सुरु होण्यापुर्वी त्याला गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला होता. त्यानंतर या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तो फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा काही प्रेक्षकांनी उभे राहुन तर काहींनी बसूनच टाळ्यांच्या कडकडाटात लायनचे मैदानावर जोरदार स्वागत केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने लायनचा १००व्या कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदा मैदानावर उतरतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. भारताविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी निवडल्यामुळे लायन बॅट घेऊन मैदानावर जाताना दिसला. यावेळी १०व्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने २४ धावा केल्या. २२ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या गाठली.
How's this for a reception for @NathLyon421! 😍#AUSvIND | https://t.co/oDTm20rn07 pic.twitter.com/L7R9mQsxi7
— ICC (@ICC) January 16, 2021
ऑस्ट्रेलियाकडून १०० कसोटी सामने खेळणारा १३वा खेळाडू
लायनने ऑगस्ट २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने ऑस्ट्रेलियाकडून १०० कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३९६ विकेट्सची खात्यात नोंद केली आहे. सोबतच १०६४ धावाही केल्या आहेत. यासह लायन हा कसोटी क्रिकेटमध्ये १०० सामने खेळणारा जगातील ६८ वा खेळाडू ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सामन्यांची शंभरी पूर्ण करणारा १३ वा खेळाडू ठरला आहे.
लायनपुर्वी ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू हेडन, मार्क टेलर, जस्टीन लँगर, डेविड बून, मिचेल क्लार्क, आयन हिली, ग्रेग मॅकग्राथ, मायकल वॉ, शेन वॉर्न, ऍलन बॉर्डर, स्टिव्ह वॉ, रिकी पाँटिंग यांनी १०० कसोटी सामने खेळले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपला
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लॅब्यूशानेने बचावात्मक पण आक्रमक फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या. २०४ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने त्याने १०८ धावांची आतिशी खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार टीम पेनने अर्धशतकी खेळी केली. इतर फलंदाजांना ५० धावांचा आकडाही गाठता आला नाही.
प्रत्युत्तरात भारताने २ विकेट गमावत ४४ धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल बाद झाले आहेत. तर कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पणवीर सुंदर आणि नटराजनची कमाल! ७१ वर्षांपुर्वीच्या ‘त्या’ मोठ्या विक्रमाची केली पुनरावृत्ती
अनुज रावतने मोहम्मद अझरुद्दीनचा एकहाती घेतलेला भन्नाट झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ