पुणे । दीव-दमण आणि तामिळनाडू या संघांनी मिनी फुटबॉल असोसिएशन आॅफ महाराष्ट्राच्या वतीने आणि मिनी फुटबॉल असोसिएशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने झालेल्या राष्ट्रीय सब-ज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धेत अनुक्रमे १४ आणि १२ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पधेर्तील १४ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत रक्षीत दुधाणीच्या हॅटट्रिकच्या जोरावर दीव-दमण संघाने बेंगलोर संघावर ४-०ने मात केली आणि विजेतेपद पटकावले.
यात रक्षीतने १८व्या, २३व्या आणि २९व्या मिनिटाला गोल करून हॅटट्रिकची नोंद केली. दीव-दमणकडून चौथा गोल हुथेफाने २५व्या मिनिटाला केला.
यानंतर तामिळनाडूने मुंबईवर २-१ने मात करून तिसरा क्रमांक पटकावला. यात तामिळनाडूकडून अलक मार (४ मि.) आणि के. कीतीर्ने (७ मि.) गोल केले, तर मुंबईकडून एकमेव गोल मानस शमार्ने (५ मि.) केला.
यानंतर १२ वर्षांखालील मुलांच्या गटात तामिळनाडूने यजमान महाराष्ट्र संघावर टायब्रेकमध्ये २-१ने मात करून विजेतेपद पटकावले. यात निर्धारित वेळेत लढत १-१ अशी बरोबरीत सुटली.
तामिळनाडूकडून हैदतुल्लाने (१४ मि.), तर महाराष्ट्राकडून आयाद आमीरने (३० मि.) गोल केला. बरोबरी झाल्याने टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात तामिळनाडूकडून केवळ हैदतुल्लालात गोल करता आला.
यानंतर हरियाणाने विदर्भ संघाचा ३-०ने पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. यात इशित रतुरीने (७, ११ मि.) दोन गोल केले, तर के. कालियाने (२१ मि.) एक गोल केला.