नाशिक | एसएसके सॉलीटीअर, सायकलीस्ट फाउंडेशन यांच्या वतीने आणि नाशिक पोलिसांच्या सहयोगाने जागतिक महिला दिनाचे निमित्ताने महिला सायकलीस्टसाठी ट्रेजर हंटचे आयोजन करण्यात आले होते. #बीब्राईट #बीबोल्ड #बीफॅब्युलस म्हणजेच ‘धाडसी बना, आनंदी राहा, उत्कृष्ट बना’ असा नारा देत शनिवारी (१० मार्च) महिला महिला सायकलीस्टसाठी ट्रेजर हंट मोठ्या उत्साहात पार पडले.
या सायकल रॅलीमध्ये सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये २०० पेक्षा जास्त महिलांनी यात सहभाग घेतला होता. विनिता सिंगल, नगररचना विभागाच्या सहायक आयुक्त प्रतिभा भदाणे, नाशिक जिल्हापरिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, मैथिली बोरसे आदी सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमादरम्यान आपापल्या क्षेत्रात उतुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. भारताची सर्वात तरुण अर्ध आयर्नमॅन ठरलेली रविजा सिंगल, चात्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय नेमबाज श्रद्धा नालामवर, पोलीस उपायुक्त (पोलीस मुख्यालय) माधुरी कांगणे, तरुण महिला उद्योजिका रंगोली शैलेश कुटे, नाशिक सायकलीस्टचा उपक्रम असलेल्या एनआरएमचे गोल्ड मेडल मिळवणाऱ्या सोनाली सुर्वे, आपल्या फिटनेस बद्दल आग्रही असणाऱ्या डॉ. मनीषा रौंदळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. नियती अग्रवाल या ९ वर्षीय ट्रेजर हंट मध्ये सहभागी झालेल्या मुलीचाही गौरव करण्यात आला.
रॅली दरम्यान विशेष वेशभूषा, उत्कृष्ठ सायकल सजावट आणि महिला सबलीकरणासाठी विशेष संदेश लिहिणाऱ्या महिलांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यात विशेष वेशभूषेचे पहिले पारितोषिक आर्या सुर्वे, दुसरे पारितोषिक डॉ. स्वाती करकरे, तर शुभांगी सांगळे यांना तिसरे पारितोषिक देण्यात आले.
१५ ते २० उत्कृष्ट सजावट करण्यात आलेल्या सायकल्स मधून पहिला क्रमांक सोनाली सुर्वे यांनी मिळवला. दुसरा क्रमांक गौरी कसात तर शिया लालवाणी हिला तिसरे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये पोलीस खात्यातील किशोरी देशपांडे यांना सायकल मिळाली.
मला सायकलिंग करायला आवडले कारण… या स्लोगन महिला सबलीकरण होण्याच्या दृष्टीने उत्तम स्लोगन लिहिणाऱ्या शिल्पा कबरे, अनघा जोशी, किशोरी देशपांडे यांना बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्यांना होम टाऊन, सोनी गिफ्ट्स, प्रिन्सेस ब्युटी पार्लर, राजधानी थाळी, मेडऑल स्पार्क डायग्नोस्टिक्स, ग्रेप काउंटी तर्फे विशेष भेटवस्तू देण्यात आल्या.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, शैलेश कुटे, नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, उपाध्यक्ष योगेश शिंदे, वैभव शेटे, मार्गदर्शक शैलेश राजहंस आदी सदस्य उपस्थित होते.
नाशिक सायकलीस्टतर्फे महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून या महिला सायकल ट्रेजर हंटचे नियोजन नीता नारंग, सोफिया कपाडिया, आदी महिला सदस्यांनी केले आहे.
यांचा झाला सन्मान
रविजा सिंगल : भारताची सर्वात तरुण अर्ध आयर्नमॅन
माधुरी कांगणे : पोलीस उपायुक्त (पोलीस मुख्यालय)
रंगोली शैलेश कुटे : तरुण महिला उद्योजिका
सोनाली सुर्वे : एनआरएमचे गोल्ड मेडलिस्ट
डॉ. मनीषा रौंदळ : फिटनेस बद्दल आग्रही व्यक्तिमत्व