ओमान व संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सातव्या टी२० विश्वचषकातील पात्रता फेरीचे सामने खेळले जात आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी युरोपमधील आयर्लंड व नेदरलँड्स हे संघ आमनेसामने आले होते. अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आयर्लंडने नेदरलँड्सला ७ गडी राखून पराभूत केले. या सामन्याचा नायक ठरलेला आयर्लंडचा अष्टपैलू कर्टिस कॅम्फर याने हॅट्रिकसह सलग चार गडी बाद करत एक नवा विक्रम रचला. मात्र, या सामन्यात नेदरलँड्सच्या फलंदाजांनी एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.
नेदरलँड्सच्या नावावर नकोसा विक्रम
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय नेदरलँड्सचा कर्णधार पीटर सेलार याने घेतला होता. मात्र, हा निर्णय पहिल्या षटकापासून चुकीचा ठरला. बेन कूपर एक चेंडू खेळून खाते न खोलता धावबाद होऊन परतला. तसेच रेयान टेन डोश्चे, स्कॉट एडवर्ड्स, वॅन डर मर्व आणि ब्रेंडन ग्लोवर हे प्रत्येकी एक चेंडू खेळून खाते न खोलता बाद झाले. टी२० क्रिकेट प्रकारात आतापर्यंत १५००० सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यात अशी आकडेवारी प्रथमच घडली आहे.
नेदरलँड्सचा दारूण पराभव
अबूधाबी येथील या सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने दहाव्या षटकात नेदरलँड्सचे पानिपत केले. त्याने या षटकात हॅट्रिकसह चार खंदे फलंदाज माघारी धाडले. वेगवान गोलंदाज मार्क एडायरने तीन बळी आपल्या नावे केले. नेदरलँड्ससाठी मॅक्स ओडोडने सर्वाधिक ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, १०७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडसाठी अनुभवी सलामीवीर पॉल स्टर्लिंगने नाबाद ३० व गॅरेथ डेलानीने ४४ धावांची खेळी केली. कॅम्फर याला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात आयर्लंडच्या क्रिकेटपटूने घडवला इतिहास! ४ चेंडूत घेतल्या सलग ४ विकेट्स