गुवाहाटी । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) नॉर्थइस्ट युनायटेडची उपांत्य फेरीतील पहिल्या टप्याच्या सामन्यात गुरुवारी बेंगळुरू एफसीविरुद्ध लढत होत आहे. बाद फेरीत प्रथमच प्रवेश करून ऐतिहासिक कामगिरी केलेल्या नॉर्थइस्टचा गतउपविजेत्या बेंगळुरूला चकविण्याचा निर्धार आहे. येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर ही लढत होईल.
गेल्या चार मोसमांत नॉर्थइस्टला बाद फेरीसाठी प्रतिक्षा करावी लागली. दोन वेळा त्यांची संधी थोडक्यात हुकली. यावेळी ही कामगिरी केल्यानंतर अधिकाधिक फायदा उठविण्याचा त्यांचा निर्धार आहे. प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांनी बेेंगळुरूला चकविण्यासाठी काय डावपेच आखले असतील याबद्दल उत्सुकता आहे.
बेंगळुरूने सलग दुसऱ्या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या टप्यात त्यांना सातत्य राखता आले नाही, तरिही त्यांनी गुणतक्त्यातील अव्वल स्थान सोडले नाही. नॉर्थइस्टने चौथ्या स्थानासह ही कामगिरी केली. आता ते संभाव्य विजेत्यांना धक्का देणार का याची उत्सुकता आहे.
शात्तोरी यांनी सांगितले की, बेंगळुरू एफसी हा अप्रतिम क्लब आहे. त्यांचा क्लब भारतात सर्वोत्तम आहे असे वाटते. याचा अर्थ आम्हाला चांगल्या खेळाडूंविरुद्ध मुकाबला करावा लागेल. आम्ही त्यांच्याविरुद्ध दोन वेळा खेळलो आहोत आणि दोन्ही वेळा फार चांगला खेळ केला. मागील वेळी येथील लढतीत त्यांनी भरपाई वेळेत बरोबरी साधली होती. त्यांच्या मैदानावर आम्ही जिंकायला हवे होते.
साखळीत नॉर्थइस्टने खरोखरच सरस खेळ केला होता. त्यांचा विजय जवळपास नक्की होता, पण चेंचो गील्टशेन याने भरपाई वेळेत बरोबरीचा गोल केला. बेंगळूरूमध्ये नॉर्थइस्टला बरोबरीचा एक गुण न मिळणे दुर्दैवी ठरले. त्यांना स्वयंगोलचा फटका बसला.
या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळे करून दाखविण्याचे आव्हान शात्तोरी यांच्यासमोर आहे. ते म्हणाले की, गेल्या 10-12 सामन्यांत मी एक कोडे सोडविण्याचा प्रयत्न करतो आहे. मी काहीसा हताश झालो आहे. आमच्याकडे केवळ 16 खेळाडू आहेत. मागील सामन्यात आम्हाला आणखी एका रेड कार्डला सामोरे जावे लागले. याशिवाय इतरही समस्या आहेत. या सामन्यासाठी आणखी थोडे जास्त पर्याय उपलब्ध असायला हवे होते अशी माझी इच्छा होती.
बेंगळुरूला अखेरच्या साखळी सामन्यात जमशेदपूरविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला, पण तेव्हा त्यांनी प्रामुख्याने दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी दिली होती. त्यामुळे या निकालामुळे मुख्य प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात फारशी चिंता करणार नाहीत. या निकालानंतरही बेंगळुरूने आघाडी राखली. बाद फेरी गाठली नसती तर इतर कशालाही अर्थ उरला नसता याची कुआद्रात यांना कल्पना आहे.
त्यांनी सांगितले की, नॉर्थइस्टकडे त्यांची अशी अस्त्रे आहेत, तशीच आमच्याकडेही आमची आहेत. त्यांच्याविरुद्ध आम्हाला झगडावे लागले असे प्रत्येक जण मला सांगतो आहे, पण त्यांना एक गुण मिळाला, तर आम्हाला चार. या लढतीत फार जिद्दीने चुरशीचा खेळ होईल, जो फुटबॉल खेळासाठी फार विलक्षण असेल.
फॉर्म आणि आधीचे रेकॉर्ड असे निकष लावले तर बेंगळुरूचे पारडे असेल, पण कोणतीही गोष्ट गृहीत धरता येणार नाही याची कुआद्रात यांना कल्पना आहे.
स्पेनचे हे प्रशिक्षक म्हमआले की, आम्हाला मागील दोन मोसमांत मिळून साखळीत 74 गुण मिळाले. दुसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवाचे 64 गुण आहेत, पण आम्ही बाद फेरीत किंवा अंतिम फेरीत हरलो तर यास काहीही अर्थ नसेल हेच मी सांगेन. हा स्पर्धेचा नियम आहे आणि आम्हाला तो स्विकारावा लागेल.
चार सामन्यांत नॉर्थइस्टला बेंगळुरूविरुद्ध कधीही निर्णायक विजय मिळालेला नाही. बेंगळुरूने तीन विजय मिळविले आहेत. जेतेपदाच्या जवळ जायचे असेल तर नॉर्थइस्टला सर्वोत्तम प्रतिस्पर्ध्याला हरवावे लागेल.