न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला आहे. मात्र, दौऱ्यातील वनडे मालिकेवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. भारतीय संघाने त्यांना तिन्ही सामन्यात धूळ चारत मालिका खिशात घातली. या मालिकेतील तिसरा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या नाकी नऊ आल्या. त्यामुळे भारताने तिसऱ्या वनडेत 90 धावांनी दमदार विजय मिळवला. एकीकडे भारताने मालिका खिशात घातली, पण दुसरीकडे तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडच्या एका गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या. या सामन्यात तीन शतके पाहायला मिळाली. त्यातील दोन शतके भारतीय संघाच्या सलामीवीरांनी ठोकली. त्यात रोहित शर्मा (101) आणि शुबमन गिल (112) यांच्या नावाचा समावेश आहे. दुसरीकडे, आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे (138) धावांचा पाऊस पाडला. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील तिसरे शतक होते. मात्र, यादरम्यान एक अनोखे शतकही पाहायला मिळाले, जे न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफी (Jacob Duffy) याने चेंडूंनी ठोकले.
जेकब डफीचा नकोसा विक्रम
भारतीय संघाच्या फलंदाजीदरम्यान जेकब डफी याने सर्वाधिक धावा खर्च केल्या. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 100 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने विकेट्स घेतल्या असल्या, तरीही तो सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्यामुळे भारताने ठोकलेल्या 385 धावांमधील 100 धावा या डफीच्या गोलंदाजीवर आल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट हा 10 इतका होता.
3RD ODI. 48.3: Jacob Duffy to Hardik Pandya 4 runs, India 379/7 https://t.co/ojTz5RqWZf #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 24, 2023
यासोबतच डफी वनडे क्रिकेटमध्ये एका सामन्यात 100 किंवा त्याहून अधिक धावा खर्च करणारा 15वा खेळाडू ठरला. दुसरीकडे, न्यूझीलंड वनडे क्रिकेट इतिहासातील तो हा लाजीरवाणा विक्रम करणारा तिसरा खेळाडू बनला. न्यूझीलंडसाठी एका वनडे सामन्यात सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वलस्थानी एम स्नेडन आहे. त्यांनी 1983 विश्वचषकात ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध 12 षटके गोलंदाजी करताना 105 धावा खर्च केल्या होत्या.
या यादीत स्नेडनसोबत संयुक्तरीत्या पहिल्या स्थानी टीम साऊदी याचा समावेश आहे. त्याने 2009मध्ये ख्राईस्टचर्च येथे भारताविरुद्ध खेळताना 105 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर डफीचा समावेश आहे. त्याने 2023मध्ये भारताविरुद्ध इंदोर येथे 10 षटके गोलंदाजी करताना 100 धावा खर्च केल्या आहेत. (new zealand pacer jacob duffy concedes 100 runs in odi match against india 3rd odi)
न्यूझीलंडसाठी एका वनडे सामन्यात सर्वाधिक धावा खर्च करणारे टॉप 3 गोलंदाज
105 धावा- एम स्नेडन, विरुद्ध- इंग्लंड (ओव्हल, 1983)
105 धावा- टीम साऊदी, विरुद्ध- भारत (ख्राईस्टचर्च ,2009)
100 धावा- जेकब डफी, विरुद्ध- भारत (इंदोर, 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट अन् गिल नाही, तर कॅप्टन रोहितने ‘या’ खेळाडूला म्हटले टीम इंडियाचा ‘जादूगार’
भोपळाही न फोडणाऱ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर; म्हणाला, ‘त्यांनी…’