टी२० विश्वचषक २०२१ च्या ३६ व्या सामन्यात न्यूझीलंडने नामिबियाचा ५२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने नामिबियासमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले. नामिबियाचा संघ निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून १११ धावाच करू शकला.
नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पण, न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. न्यूझीलंड संघाचे ८७ धावांवर चार गडी बाद झाले होते.
पण ग्लेन फिलिप्सने २१ चेंडूत नाबाद ३९ धावा करत संघाचा डाव सावरला. त्याला नीशमने चांगली साथ देत २३ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी अवघ्या ३६ चेंडूत नाबाद ७६ धावांची भागीदारी केली. फिलिप्सने आपल्या खेळीत एक चौकार आणि तीन षटकार मारले, तर नीशमने एक चौकार आणि दोन षटकार मारले. फिलिप्स आणि नीशम यांच्यामुळे न्यूझीलंडने शेवटच्या तीन षटकांत ५३ धावा जोडल्या. न्यूझीलंडने निर्धारित २० षटकात १६३ धावा केल्या.
नामिबियासाठी सलामीवीर स्टीफन बार्ड (२१) आणि मायकेल व्हॅन लिंगेन (२५) यांनी पहिल्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. नीशमने लिंगेनला त्रिफळाचीत करत संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर धावसंख्येमध्ये फक्त चार धावांची भर पडली होती, तेव्हढ्यात मिचेल सँटनरने बार्डला त्रिफळाचीत केले. त्यानंतर चार धावा जोडल्यानंतर कर्णधार गेरहार्ड इरास्मसच्या रूपाने नामीबिया संघाने तिसरी विकेट गमावली.
डेविड विसेकडून संघाला अपेक्षा होती, पण तोही लवकर बाद झाला. त्याने १७ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह १६ धावा केल्या. टीम साऊथीने आपल्या कोट्यातील शेवटच्या षटकात जेन ग्रीनला (२३) बाद केले. ट्रेंट बोल्टच्या षटकात नामिबियाने सलग दोन विकेट गमावल्या.
न्यूझीलंडसाठी अनुभवी टीम साऊथीने पुन्हा आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत चार षटकांत १५ धावा दिल्या आणि ट्रेंट बोल्टने २० धावांत दोन बळी घेतले. जिमी नीशमने एका षटकात सहा धावा देऊन एक विकेट घेतली. फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगल्या कामगिरीबद्दल त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
टी२० विश्वचषकातील या तिसऱ्या विजयासह न्यूझीलंड संघाने सहा गुणांसह गट २ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि या विजयासह त्यांचा नेट रनरेट १.२७७ आहे, तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताचा रनरेट १.६१९ आहे. त्याचबरोबर, अफगाणिस्तानचा नेट रनरेट १.४८१ आहे. पण, न्यूझीलंडसाठी जमेची बाजू अशी की त्यांनी ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर, अफगाणिस्तान आणि भारताने ४ पैकी प्रत्येकी २ सामने जिंकले आहेत.
त्यामुळे जर न्यूझीलंड संघाने त्यांचा शेवटचा गट सामना अफगाणिस्तानविरुद्ध जिंकला, तर ते नेट रनरेटचा विचार न करता थेट उपांत्य फेरीत पोहोचतील. मात्र अफगाणिस्तानकडून न्यूझीलंड संघ पराभूत झाल्यास नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
खुलासा! ‘या’ कारणामुळे रोहित घालतो ४५ क्रमांकाची जर्सी, स्वत: ‘हिटमॅन’ने उघड केले गुपीत