कोलंबो। श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा अर्धशतक करून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. त्याचबरोबर भारताकडून जयदेव उनाडकटने ३८ धावा देत ३ विकेट्स घेऊन बांगलादेशला १३९ धावात रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली.
बांग्लादेशने भारतासमोर विजयासाठी २० षटकात १४० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली होती. मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही लगेचच रोहित शर्मा(१७) बाद झाला.
त्यानंतर रिषभ पंतला(७) तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. पण त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. त्याला रुबेल हुसेनने त्रिफळाचित बाद केले. त्यामुळे भारताची अवस्था २ बाद ४० धावा अशी झाली होती.
यानंतर मात्र मागील सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणारा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि सुरेश रैनाने भारताचा डाव सांभाळला. या दोघांनीही मिळून तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. पण ही जोडी फोडण्यात हुसेनला यश आले. त्याने रैनाला २७ चेंडूत २८ धावांवर असताना बाद केले.
त्यानंतर शिखर आणि मनीष पांडे या जोडीने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण भारत विजयाच्या समीप असताना शिखर बाद झाला. शिखरने या सामन्यात २ षटकार आणि ५ चौकारांच्या साहाय्याने ४३ चेंडूत ५५ धावा केल्या.
अखेर शिखर बाद झाल्यावर मनीष पांडे(२७*) आणि दिनेश कार्तिकने(२*) भारताचा विजय साकार केला.
बांग्लादेशकडून रुबेल हुसेन(२/२४), तस्कीन अहमद(१/२८) आणि मुस्तफिझूर रहमान(१/३१) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात खराब केली. त्यांचे तमिम इकबाल(१५) आणि सौम्य सरकार(१४) हे दोन्ही सलामीवर लवकर बाद झाले. त्यानंतर लिटोन दास(३४) आणि मुशफिकूर रहीम(१८) यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघेही खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर बाद झाले.
यानंतर फक्त शब्बीर रेहमान(३०) याने थोडीफार लढत देण्याचा प्रयन्त केला. पण त्याला उनाडकटने बाद करून बांग्लादेशला ७ वा धक्का दिला. बांग्लादेशच्या बाकी फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. त्यांनी आपल्या विकेट नियमित कालांतराने गमावल्या.
बांग्लादेशकडून बाकी फलंदाजांपैकी कर्णधार महमुदुल्लाह रियाद(१), मेहेदी हसन(३), तस्कीन अहमद(८*), रुबेल हुसेन(०) आणि मुस्तफिझूर रहमान(१*) यांनी धावा केल्या.
भारताकडून जयदेव उनाडकट(३/३८), विजय शंकर(२/३२), शार्दूल ठाकूर(१/२५) आणि युझवेंद्र चहल(१/१९) यांनी विकेट्स घेत बांग्लादेशला २० षटकात ८ बाद १३९ धावांवर रोखले.