मुंबई, दिनांक 4 मार्च ः हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने इतिहासात प्रथमच बाद फेरी गाठली. त्यांची बचाव फळी आयएसएलमध्ये कशी तग धरणार असा प्रश्न पडलेल्या टीकाकारांना याद्वारे नॉर्थइस्टने चोख प्रत्यूत्तर दिले आहे. या पार्श्वभूमीवर टीकाकारांना टोला लगावण्याचा मोह प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांना रोखता आला नाही.
लीगमधील मुळ आठ संघांमध्ये यापूर्वी बाद फेरी गाठू न शकलेल्या संघांमध्ये नॉर्थइस्ट एकमेव होता. यावेळी संघाची ही कामगिरी साकार करून शात्तोरी यांनी प्रत्येकाला चुकीचे ठरविले.
मर्यादीत बजेट आणि फारसे वलय नसलेल्या खेळाडूंकडून शात्तोरी ही कामगिरी करून घेऊ शकले हे महत्त्वाचे आहे. आक्रमक मध्यरक्षक फेडेरिको गॅलेगो आणि स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे यांनी संपूर्ण साखळीत चमकदार कौशल्य प्रदर्शित केले हा महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण चिवट बचाव हे नॉर्थइस्टच्या वाटचालीचे मुख्य वैशिष्ट्य राहिले आहे.
शात्तोरी यांनी सांगितले की, मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वी आमचा बचाव फार कमकुवत असल्याची टीका झाली होती, पण आता आमच्याविरुद्धच सर्वांत कमी गोल झाले आहेत.
18 सामन्यांत केवळ 18 गोल ही शात्तोरी यांच्या संघाची कामगिरी यंदाच्या लिगमध्ये सर्वोत्तम ठरली आहे. यातील पाच गोल एका सामन्यात एफसी गोवाविरुद्ध झाले. त्या सामन्यात एफसी गोवाने धुमाकुळ घातला होता.
बचाव फळीत ज्या प्रकारचे खेळाडू होते आणि दुखापतींची समस्या हे मुद्दे लक्षात घेतले तर नॉर्थइस्टची कामगिरी आणखी कौतुकास्पद ठरते. मिस्लाव कोमोर्स्की आणि मॅटो ग्रजिच यांनी प्रारंभी मोठा वाटा उचलला. यात क्रोएशियाच्या या बचावपटूंनी चमकदार भागिदारी निर्माण केली. इतर बचावपटूंना मात्र फारशी प्रेरणा मिळेल अशी स्थिती नव्हती.
रिगन सिंग, रॉबर्ट लालथ्लामुना आणि किगन परेरा अशा सर्वांची कामगिरी अगदी सामान्य झाली होती. प्रोवात लाक्रा आयएसएलमधील पहिलाच मोसम खेळत होता, पण या फुलबॅक खेळाडूंनी आपल्या क्षमतेची पुरेपूर प्रचिती दिली. पवन कुमार आणि गुरविंदर सिंग हे मध्यवर्ती बचावासाठी इतर पर्याय होते. गेल्या काही वर्षांत पवन अव्वल श्रेणीत क्वचितच खेळला आहे, तर गेल्या मोसमात ईस्ट बंगालने काढल्यानंतर गुरविंदरचा लौकीक बराच खालावला होता.
कोमोर्स्की दुखापतीमुळे उरलेल्या मोसमास मुकणार हे स्पष्ट होताच शात्तोरी यांच्या संघासमोर मोठाच पेच निर्माण झाला होता, पण तेव्हापासून गुरविंदरने ही पोकळी भरून काढली.
आता बाद फेरीपूर्वी मात्र समस्या निर्माण झाली आहे. अखेरच्या साखळी सामन्यात ब्लास्टर्सविरुद्ध गुरविंदरला मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे उपांत्य फेरीत बेंगळुरू एफसीविरुद्ध काय करायचे याविषयी शात्तोरी यांना बराच विचार करावा लागेल.
सहाय्यक प्रशिक्षक शॉन ऑन्टाँग यांनी सांगितले की, गुरविंदरच्या निलंबनामुळे आम्हाला आढावा घेऊन पर्याय शोधावा लागेल.
ब्लास्टर्सविरुद्ध सुरवातीलाच एक खेळाडू कमी होऊनही नॉर्थइस्टच्या बचाव फळीने क्लीन शीट राखली. शॉन म्हणाले की, आम्हाला खास करून बचावातील या कामगिरीचा फार अभिमान वाटतो. आम्ही चमकदार कामगिरी बजावली असे वाटते. त्या प्रयत्नांमुळे आम्हाला एक गुण मिळाला.
दुखापती आणि आता गुरविंदरच्या निलंबनानंतरही नॉर्थइस्ट आतापर्यंतच्या मोसमात करून दाखविले त्याप्रमाणेच काही तरी मार्ग काढेल आणि उपांत्य फेरीत बचाव भक्कम करेल अशा आहे.