मुंबई | आयपीएलच्या ११व्या पर्वाला आज सुरूवात होत आहे. शेषराव वानखेडे स्टेडीअम, मुंबई येथे आज उद्धाटन समारंभानंतर एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स या संघात सलामीचा सामना होणार आहे.
आजपर्यंत आयपीएलच्या सर्व पर्वात मिळून ६९४ खेळाडू खेळले आहेत. त्यातील तब्बल ३१६ खेळाडूंना आयपीएलमुळे करोडपती होता आले आहे.
म्हणजे जवळपास आयपीएलमधील ४५.२४% खेळाडू हे या स्पर्धेमुळे करोडपती झाले. यातील अनेक खेळाडू हे अतिशय गरिब कुटूंबातून आलेले आहेत.
आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या ६९४ खेळाडूंना मिळून आजपर्यंत तब्बल ४२८४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
परंतु MONEYBALL वेबसाईट प्रमाणे केवळ एमएस धोनी आणि रोहीत शर्मा या खेळाडूंनी आजपर्यंत सर्व आयपीएलमध्ये १०० कोटी रुपये कमवले आहेत.
एमएस धोनी १०७.८४ कोटी-
धोनीने अायपीएलच्या ११ मोसमात तब्बल १०७.८४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याने ८ मोसमात चेन्नईकडून तर दोन मोसमात पुण्याकडून भाग घेतला होता. यावेळी पुन्हा तो त्याचा जुना संघ चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार आहे. त्याला यावर्षा चेन्नईने तब्बल १५ कोटी रुपये मोजत संघात कायम केले आहे.
रोहित शर्मा १०१.१६ कोटी-
दुसरा खेळाडू म्हणजे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा. रोहितने सर्व आयपीएल मिळून आजपर्यंत १०१.१६ कोटी रुपये कमवले आहेत. त्याने आयपीएलच्या ४थ्या पर्वात डेक्कनला बाय-बाय करत मुंबईचा रस्ता धरला. त्यालाही या मोसमात १५ कोटी रुपये देत मुंबईने संघात कायम केले आहे.