पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि वाद यांचे खूप जुने नाते आहे. अनेकदा पाकिस्तानी क्रिकेटपटू वादाच्या विळख्यात सापडले आहेत. अनेकदा या खेळाडूंना मैदानात वाद घातल्यामुळे मालिकेतून बाहेर देखील करण्यात आले आहे. परंतु आता जो प्रकार घडला आहे, त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूला चक्क इंग्लंडहून मायदेशी पाठवण्यात आले आहे. काय आहे प्रकार? चला पाहूया.
एकीकडे पाकिस्तान संघ इंग्लंड संघाविरुद्ध वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने बाजी मारली होती. तर दुसरीकडे लवकरच इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज वाहब रियाजने देखील सहभाग घेतला आहे. परंतु स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्याला पाकिस्तानला पाठवण्यात आले आहे. यामागील कारण असे की, त्याच्याकडे वर्क व्हिजा नव्हता. (Pakistan fast bowler wahab Riaz reported from England due to visa issues)
वाहब रियाज द हंड्रेड स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्स या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.त्याला कुल्टर नाईल ऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे. कुल्टर नाईलने या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. वाहब रियाजला वर्क व्हिजा मिळवण्यासाठी अर्ज द्यावा लागणार आहे.त्यानंतर त्याला इंग्लंडला जाण्याची अनुमती दिली जाणार आहे.
वाहब रियाजला इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या पाकिस्तान संघात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे त्याने द हंड्रेड स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रियाज गेल्या काही महिन्यांपासून चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी करत १८ गडी बाद केले होते. तरीदेखील त्याला पाकिस्तान संघात संधी देण्यात आली नाही.
परंतु द हंड्रेड लीगच्या फ्रँचायझींनी त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याची निवड केली आहे. मात्र वर्क व्हिजा नसल्याने तो एकही सामना न खेळता मायदेशी परतला आहे. आता त्याला वर्क व्हिजा मिळाल्यानंतरच इंग्लंडला परत जाता येतील. त्याला द हंड्रेड लीगच्या ट्रेंट रॉकेट्स संघात नाथन कूल्टर नाइलच्या जागी सहभागी करण्यात आले आहे.
पाकिस्तान संघाचा फ्लॉप शो
पाकिस्तान संघाने इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत निराशाजनक सुरुवात केली आहे. पहिल्याच वनडे सामन्यात इंग्लंडच्या द्वितीय श्रेणीच्या संघाने पाकिस्तान संघाला ९ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना २१.५ षटकात अवघ्या १४१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने १ गडीच्या मोबदल्यात हा सामना आपल्या नावावर केला होता. आज (१० जुलै) या मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
टीम धवनशी भिडणार श्रीलंकेचा नवा संघनायक, मागील ४ वर्षांत बदललेत चक्क ‘इतके’ कर्णधार
परवाच ‘या’ क्रिकेटरने केली १५० धावांची विक्रमी खेळी, आता अचानकच निवृत्ती घेत दिला धक्का
क्रिकेटच्या मैदानावरील सुपरहिरो गावसकर झाले होते मराठी चित्रपटात हिरो