पाकिस्तान सुपर लीगमध्ये चाहत्यांना पहिल्यांदाच सुपर ओव्हर पाहायला मिळाली. परवा लाहोर कलंदर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. त्यावेळी मोहम्मद सामीने टाकलेल्या लेथल बाउन्सरमुळे सामना बरोबरीचा झाला आणि पहिल्यांदाच पीएसएलमध्ये सुपर ओव्हर रंगली.
या सामन्यात इस्लामाबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना लाहोर संघासमोर १२२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना ब्रेंडन मॅक्युलम आणि अघा सलमान या दोघांनी चांगली लढत दिली. परंतु बाकी फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर लाहोर संघ विजयाच्या समीप होता.
त्याचवेळी अखेरच्या षटकात लाहोर संघाला ७ धावांची आवश्यकता होती आणि खेळपट्टीवर मॅक्युलम आणि सलमान इर्शाद होते. मात्र लाहोर संघाच्या ८ विकेट्स आधीच पडल्या असल्याने मॅक्युलम आणि इर्शादला जबाबदारीने खेळावे लागणार होते.
या षटकात इस्लामाबाद संघाने सामीकडे चेंडू सोपवला. मात्र या षटकात मॅक्युलमने आपली विकेट गमावली. त्यामुळे लाहोर संघावर दाबाव आणखी वाढला. हा दबाव कमी करण्यासाठी इर्शादने एक चौकार मारला ज्यामुळे सामन्यातील धावसंख्या बरोबरीची झाली. लाहोरला जिंकण्यासाठी ३ चेंडूत १ धावेची गरज असताना सामीने लेथल बाउन्सर टाकून इर्शादला असिफ अलीकडे झेल देण्यास भाग पाडले.
यामुळे लाहोरचा संघ सर्वबाद झाला पण सामन्यातील दोन्ही संघाच्या धावसंख्या बरोबरीच्या झाल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
OUT! 19.4 Mohammad Sami to Salman Irshad
Watch ball by ball highlights at https://t.co/ppEzSxzUv8#IUvLQ #HBLPSL #Cricingif #PSL2018 pic.twitter.com/B3cuCd42v4— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 2, 2018
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना लाहोरने १ बाद १५ धावा केल्या. त्यामुळे इस्लामाबादला जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती.
इस्लामाबाद संघाकडून आंद्रे रसल आणि असिफ अली सलामीला खेळायला आले. तर लाहोर संघाकडून बांग्लादेशच्या मुत्सफिझूर रेहमानने गोलंदाजीची जबाबदारी घेतली. षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर असिफने षटकार खेचत इस्लामाबादला चांगली सुरुवात दिली. पण यानंतरच्या दोन चेंडूवर एकच धाव इस्लामाबाद संघाला घेता आली.
त्यामुळे त्यांना जिंकण्यासाठी २ चेंडूत ८ धावांची गरज होती. त्याचवेळी रहिमने वाईड चेंडू टाकला आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर रसेलने चौकार मारला. त्यामुळे १ चेंडूत इस्लामाबादला ३ धावांची गरज असताना पुन्हा एकदा रसेलने जोरदार फटका मारताना षटकार खेचत इसलाबादचा विजय निश्चित केला.