भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने उत्तम गोलंदाजी केली आहे. भारताच्या पहिल्या डावात कमिन्सने 4 फलंदाजांना बाद केले. कमिन्सने यादरम्यान भारताचा महत्त्वाचा खेळाडू चेतेश्वर पुजाराला एका अप्रतिम चेंडूवर बाद केले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने पुजारा विरुद्धच्या आपल्या रणनीतीचा खुलासा केला आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान कमिन्स म्हणाला, “आज मला खेळपट्टीतून मदत मिळत होती. मात्र तुम्हा सर्वांना माहीतच आहे की पुजारा विरुद्ध तुम्हाला भरपूर गोलंदाजी करावी लागेल. आम्ही मालिकेपूर्वी रणनीती ठरवली होती की पुजाराला धावा करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल अशी गोलंदाजी करायची. तो 200 चेंडू खेळो अथवा 300 चेंडू. आम्ही त्याला धावा काढण्यासाठी मेहनत करण्यास भाग पाडणार होतो. सुदैवाने आतापर्यंत मालिकेत ही रणनीती यशस्वी झाली आहे.”
चेतेश्वर पुजाराने भारताच्या पहिल्या डावात तब्बल 176 चेंडूंचा सामना करत 50 धावा केल्या. पुजाराच्या या अतिबचावात्मक खेळासंदर्भात सोशल मीडियावर अनेक क्रिकेट पंडितांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान सामन्याचा विचार केला असता ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उभारलेल्या 338 धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव केवळ 244 धावांवर आटोपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात 2 गडी गमावत 103 धावांपर्यंत मजल मारली होती. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय समर्थकांना आशा असेल की भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियन खेळाडूंना लवकरात लवकर बाद करतील, व भारत पुन्हा एकदा सामन्यात बरोबरीत येईल.
महत्वाच्या बातम्या:
पॅट कमिन्सची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजाला दुखापत, हे समीकरण तर ठरलेलंच! पाहा अजब योगायोग
दुःखद.! झहीर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन