गुवाहाटी । खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात खो-खो मध्ये महाराष्ट्राला पर्याय नाही याचाच प्रत्यय पाहावयास मिळाला. महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही गटात अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली आणि दुहेरी मुकूट पटकाविला.
मुख्य स्टेडियमवर झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने केरळचा १६-१४ असा तीन मिनिटे राखून पराभव केला. मध्यंतराला दोन्ही संघ ९-९ अशा बरोबरीत होते. तथापि उत्तरार्धात महाराष्ट्राने पळतीमध्ये सुरेख कौशल्य दाखवित फक्त पाचच गडी गमावले. त्यामुळे त्यांच्यासाठी विजय सोपा झाला.
त्यांच्या विजयात निहार दुबळे (एक मिनिट १० सेकंद, एक मिनिट ४० सेकंद व २ गडी), संकेत कदम (दीड मिनिटे, नाबाद एक मिनिट १० सेकंद व ४ गडी), दिलीप खांडवी (दोन मिनिटे व दीड मिनिट) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. केरळकडून एस.विशोग (एक मिनिट १० सेकंद व २ मिनिटे), के.सोमजित (दीड मिनिटे व एक मिनिट १० सेकंद) यांची लढत अपुरी ठरली.
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ९-६ एक डाव ३ गुणांनी दणदणीत पराभव केला. पूर्वार्धात महाराष्ट्राकडे ९-२ अशी मोठी आघाडी घेतली होती. महाराष्ट्राच्या विजयात प्रियांका भोपी (एक मिनिट व नाबाद ४ मिनिटे ४० सेकंद), रेश्मा राठोड (२ मिनिटे २० सेकंद व २ मिनिटे ५० सेकंद) अपेक्षा सुतार (एक मिनिट ५० सेकंद, २ मिनिटे ४० सेकंद व एक गडी), काजल भोर (३ गडी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
कर्नाटकच्या के. तेजश्री (३ मिनिटे १० सेकंद) व एल. मोनिका (४ गडी) यांचा अपवाद वगळता एकही खेळाडू चमक दाखवू शकला नाही. गतवषीर्ही महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुलींचे विजेतेपद पटकाविले होते.
गुवाहाटी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भ्रमणध्वनीवरून केले. शनिवारी २१ वर्षाखालील मुले व मुलींच्या खो-खोच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनुक्रमे केरळ व कर्नाटक संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
त्यावेळी पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्या भ्रमणध्वनीवर आ. रोहित पवार यांचा फोन आला. त्यावेळी पवार यांनी खो-खो संघासह महाराष्ट्रातील सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. जे खेळाडू पदक जिंकू शकले नाहीत त्यांनी अजून जास्त सराव करून पुढील वर्षी या स्पर्धेत पदके जिंकावीत.
याच बरोबर महाराष्ट्रातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्ध्यांमध्ये पदके जिंकून आपल्या राज्याचे व देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन आ. पवारांनी खेळाडूंना केले.