गुवाहाटी । खेलो इंडिया युथ गेम्सच्या अखेरच्या टप्प्यात खो-खोमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकांचा चौकार नोंदवित महाराष्ट्राने निर्विवाद वर्चस्व गाजविले. महाराष्ट्राने १७ वर्षाखलील मुले व मुली या ग
टांमध्येही अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली.
मुख्य स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेतील १७ वर्षाखालील मुलांमध्ये महाराष्ट्राने गुजरातचा १९-११ असा सहज पराभव केला. पूर्वार्धात त्यांच्याकडे १०-५ अशी आघाडी होती. त्यांच्या विजयात रामजी कश्यप (साडेचार मिनिटे व एक गडी), ह्रषिकेश शिंदे (२ मिनिटे २० सेकंद व ४ गडी), सिद्धेश थोरात (२ मिनिटे व ५ गडी) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. गुजरातकडून विजयकुमार ( एक मिनिट ४० सेकंद व ३ गडी) व राजेश रथ ( ३ गडी) यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
महाराष्ट्राने मुलींच्या १७ वषार्खालील गटाच्या अंतिम सामन्यात दिल्ली संघाला १४-८ असे निष्प्रभ केले. मध्यंतराला त्यांच्याकडे ९-४ अशी आघाडी होती.
महाराष्ट्राकडून प्रांजल मडकर (२ मिनिटे ४० सेकंद, १ मिनिट २० सेकंद व एक गडी), प्रीति काळे (१ मिनिट १० सेकंद, ४ मिनिटे व १ गडी), किरण शिंदे (दीड मिनिटे, दोन मिनिटे व २ गडी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
दीक्षा सोनसूरकर हिने ६ गडी बाद करीत त्यांना चांगली साथ दिली. दिल्लीकडून नयनाकुमारी व मोनिका यांनी प्रत्येकी २ मिनिटे २० सेकंद पळतीचा खेळ केला.
महाराष्ट्राने या स्पर्धेतील २१ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही गटांतही सुवर्णपदक मिळविले होते. नवी दिल्ली येथे २०१८ मध्ये झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत व त्यानंतर पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही महाराष्ट्राला चारही गटांमध्ये विजेतेपद मिळाले होते.
जय भिवानी जय शिवाजी चा नारा
महाराष्ट्राचे सामने पाहण्यासाठी भरपूर चाहत्यांनी गर्दी केली होती. या चाहत्यांनी जय भिवानी जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरया, जय महाराष्ट्र अशा घोषणा देत या खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्र अंतिम फेरीत
महाराष्ट्राने उत्कंठापूर्ण लढतीत पंजाबवर ७७-७६ असा निसटता विजय नोंदविला आणि मुलींच्या २१ वषार्खालील गटात अंतिम फेरी गाठली. पूर्वार्धात महाराष्ट्राकडे ३८-३५ अशी आघाडी होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरला.
महाराष्ट्र संघाच्या विजयात कर्णधार श्रेया दांडेकर (२६), दुर्गा धर्माधिकारी (१९) व ऋतुजा पवार (१६) यांनी मोठा वाटा उचलला. पंजाबकडून हरसिमरन धामी व राजदीप कौर यांनी प्रत्येकी २१ गुण नोंदवित एकाकी लढत दिली. खेलो इंडिया स्पर्धेत गतवर्षी २१ वषार्खालील गटाचा समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्राने प्रथमच या स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली.