पुणे। भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणनेश्वरण हा आगामी टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतील एकेरीच्या मुख्य ड्रॉ मध्ये स्थान मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस टेनिस संघटना(एमएसएलटीए) व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी स्टेडीयम येथे 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे.
पोलंडच्या कॅमिल मॅकक्रेझाक याने माघार घेतल्यामुळे प्रजनेशला ही सुवर्णसंधी मिळाली. विश्वक्रमवारीत 123व्या स्थानावर असलेला प्रजनेश सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी झाला होता.
ही त्याची पाचवी ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. टाटा ओपनच्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी पर्यायी खेळाडूंच्या यादीत जपानच्या गो सोएडा याच्या पाठोपाठ प्रजनेश दुसऱ्या स्थानावर होता. 47 व्या मानांकित गो सोएडा यानेही टाटा ओपन मधून अखेरच्या क्षणी माघार घेतल्यामुळे प्रजनेशला मुख्य ड्रॉ मध्ये थेट प्रवेश मिळविता आला.
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, प्रजणेशच्या प्रवेशामुळे एकेरीच्या मुख्य ड्रॉ मध्ये भारताचे आव्हान दिसून येणार आहे. आशियातील या एकमेव एटीपी स्पर्धेत भारतीय खेळाडूचा सहभाग असणे ही खूपच महत्वाची गोष्ट आहे.कारण या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना अधिकाधिक फायदा व्हावा, ही स्पर्धा आयोजनामागचा हेतू आहे.
एमएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, 30 वर्षीय प्रजनेश टाटा ओपनच्या दोन्ही मालिकेत सुद्धा सहभागी झाला होता. यंदाच्या वर्षी आपली छाप पाडण्यासाठी तो उत्सुक आहे. टाटा ओपनच्या गेल्या दोन मालिकेत अनेक भारतीय खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.
मायदेशातील प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे सर्वोत्तम कामगिरी बजावण्याकरिता भारतीय खेळाडूंना हे उत्तम व्यासपीठ आहे. पुण्यातील प्रेक्षक टेनिस प्रेमी असून त्यांचा भारतीय खेळाडूंना नेहमीच पाठिंबा लाभला आहे.
टाटा ओपन महाराष्ट्र ही भारतातील अग्रगण्य अशी एटीपी 250 दर्जाची स्पर्धा असून या स्पर्धेतील प्रतिष्ठेचे विजेतेपद जिंकण्यासाठी इव्हो कार्लोवीच, बेनॉय पेर, फिलिप कोहेलश्रीबर असे जगांतील अव्वल दर्जाचे टेनिसपटू यंदाच्या वर्षी आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.