इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांनी कसोटी आणि टी२० मालिकेचा टप्पा पूर्ण केला आहे. यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मंगळवार (२३ मार्च) पासून वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे ही वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघांच्या बोर्डांनी वनडे संघाची घोषणा केली आहे. परंतु अद्याप भारत-इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? हे स्पष्ट झालेले नाही.
यजमान भारताने टी२० मालिकेतील शेवटचे सलग २ सामने जिंकले आहेत. त्यामुळे वनडेतील सलामीच्या सामन्यातही विजयी घोडदौड कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसरीकडे पाहुणा इंग्लंड संघ आपली डगमगती गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करताना दिसेल. अशात दोन्ही संघ थोडेफार बदल करत टी२०तील अंतिम अकरा जणांच्या पथकासह मैदानावर उतरु शकतात.
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, अष्टपैलू कृणाल पंड्या याला पहिल्या वनडे सामन्यातून पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. त्याने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय संघ नक्कीच त्याच्या चांगल्या फॉर्मचा पुरेपूर फायदा घेईल.
हा मुख्य बदल सोडून सलामीवीर केएल राहुलला पुन्हा एकदा आजमावले जाऊ शकते. राहुलला वगळता इतर सर्व फलंदाजांनी टी२० मालिकेत दमदार प्रदर्शन केले आहे. मात्र राहुलचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फलंदाजी प्रदर्शन आणि यष्टीमागील कामगिरी पाहता त्याला वनडेत पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.
याबरोबरच अनुभवी फलंदाज शिखर धवनला आजमावण्याचा विचार केला जाऊ शकतो. अशात सूर्यकुमार यादवला पहिल्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते.
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची दुखापतीमुळे वनडे संघात निवड करण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्याजागी मार्क वुडला खेळवले जाऊ शकते. वुडने भारताविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत महत्त्वपुर्ण विकेट्स घेतल्या होत्या. अशात भारताविरुद्ध तो वनडे पुनरागमन करु शकतो.
असा असू शकतो भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल/शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल
असा असू शकतो इंग्लंडचा संघ-
ऑयन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, डेविड मलान, सॅम बिलिंग्स, मार्क वुड, सॅम कुरेन, टॉम करेन, आदिल रशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस जॉर्डन
महत्त्वाच्या बातम्या-
“माझ्या भावामुळे…,” अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या युसूफने व्यक्त केल्या भावना
अखेर इंग्लिश दिग्गजाने भारताला मानलं; म्हणाले, “विराट-रोहितमध्ये सचिन-सेहवागची झलक दिसली”
विराटसोबत ओपनिंग करण्याबद्दल विचारल्यावर रोहितने सोडले मौन; म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत…’