मुंबई। सध्या सुरु असणाऱ्या रणजी स्पर्धेत प्रतिभावान युवा फलंदाज पृथ्वी शॉने मुंबई संघाकडून खेळताना १२३ धावांसह त्याचे तिसरे शतक पूर्ण केले आहे. त्याने हे शतक तामिळनाडू संघाविरुद्ध केले. दिवसाखेर मुंबईची धावसंख्या सध्या ७ बाद ३१४ अशी आहे.
या सामन्याचा आज पहिलाच दिवस आहे. मुंबई संघाचा कर्णधार आदित्य तारेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. मुंबईची सुरुवात तशी खराबच झाली. पृथ्वी बरोबर सलामीला आलेला अखिल हेरवाडकर शून्य धावांवर बाद झाला.
त्यानंतर कालच भारतीय टी २० संघात निवड झालेला श्रेयश अय्यरने पृथ्वीची भक्कम साथ देताना अर्धशतक केले. या दोघांची ९८ धावांची भागीदारी अखेर तामिळनाडूच्या विजय शंकर या गोलंदाजाने श्रेयसला बाद करत तोडली.
या नंतर मात्र पृथ्वीला म्हणावी तशी साथ सूर्य कुमार यादव आणि त्यानंतर आलेला एस. डी. लाड यांनी दिली नाही. सूर्य कुमारबरोबर जरी अर्धशतकी भागीदारी झाली असली तरी तिला वाढवण्यात अपयश आले. सूर्यकुमार ३९ धावांवर असताना बाद झाला. तर एस. डी. लाड १८ धावांवर असताना भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्विनने त्याला बाद केले.
यानंतर मुंबई मोठा धक्का बसला तो पृथ्वी बाद झाल्यावर. शतकवीर पृथ्वीला अश्विनने इंद्रजित बाबाकडे झेलबाद केले. सध्या अभिषेक नायर खेळत आहे.
पृथ्वीने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना ३ शतके केली आहेत . त्याचे सध्याचे वय फक्त १७ वर्ष आणि ३४९ दिवसांचा आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयात प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत आता त्याने तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अंकित बाणवेची बरोबरी केली आहे. अजूनही मास्टर ब्लास्टर
सचिन तेंडुलकर या यादीत ८ शतकांसह अव्वल स्थानी आहे. तर अंबाती रायडू ४ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.