भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघ २ बाद १०३ धावांवर आहे. मार्नस लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथ फलंदाजी करत आहेत. भारतीय गोलंदाजांनी या डावात पहिल्या १० षटकांच्या आतच ऑस्ट्रेलियाच्या सलामीवारांना माघारी धाडले होते.
अश्विनचा सर्वाधिक वेळा शिकार बनला आहे वॉर्नर
या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी ३३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ पहिल्या डावात २४४ धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ९४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजी करण्यासाठी डेविड वॉर्नर आणि पदार्पणवीर विल पुकोवस्की आले होते. परंतु अवघ्या १६ धावांवर भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिरजाने पुकोवस्कीला बाद करत त्यांची भागिदारी मोडली.
त्यानंतर वॉर्नर लॅब्यूशानेसोबत मिळून संघाचा डाव पुढे नेत होता. अशात डावातील १०वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अश्विनच्या फिरकीत वॉर्नर फसला. यामुळे २९ चेंडूत केवळ १३ धावांवर वॉर्नर पायचित झाला.
महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत वॉर्नरने भारताविरुद्ध १७ कसोटी सामने खेळले असून १०९९ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने ४ शतकेही ठोकली आहेत. मात्र भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा हा डावखुरा फलंदाज अश्विनला चांगलाच टरकतो. कारण अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिकवेळा वॉर्नरला बाद केले आहे. नुकतीच सिडनी कसोटीत अश्विनने वॉर्नरची विकेट काढत सर्वाधिक १० वेळा त्याला बाद करण्याचा करण्याचा पराक्रम केला आहे.
अश्विनने कसोटी कारकिर्दीत सर्वाधिकवेळा बाद केलेले फलंदाज
वॉर्नरनंतर ऍलिस्टर कूक अश्विनचा सर्वाधिकवेळा शिकार ठरला आहे. अश्विनने कूकला ९ वेळा आपल्या फिरकीत फसवले आहे. तर इडी काउन आणि बेन स्टोक्स यांना त्याने ७ वेळा बाद केले आहे. याशिवाय कसोटीत अश्विनच्या हातून सर्वाधिकवेळा बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ड्वेन ब्रावो, डिन एल्गार, मॉर्नी मॉर्केल, के पॉवेल, मार्लोन सॅम्युअल्स आणि मिशेल स्टार्क यांचा समावेश आहे. अश्विनने या फलंदाजांना ६ वेळा तंबूत धाडले आहे.
कसोटी मालिकेत अश्विनने केली नेत्रदिपक गोलंदाजी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आतापर्यंत दोन सामने झाले असून तिसरा सामना चालू आहे. या मालिकेदरम्यान अश्विनचे वेगळेच रुप पाहायला मिळाले आहे. अश्विन परदेशातील मैदानावर त्याच्या सरासरी गोलंदाजीसाठी कुप्रसिद्ध आहे. पण यावेळी यजमान ऑस्ट्रेलिया संघाच्या दिग्गज क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथला अश्विनने दोन वेळा बाद केले आहे.
ऍडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने एकूण ५ विकेट्स घेतल्या आहेत. यात पहिल्या डावातील ४ आणि दुसऱ्या डावातील एका विकेटचा समावेश आहे. तर मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. सिडनीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आतापर्यंत त्याने वॉर्नरची एकमेव विकेट घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND v AUS : स्मिथ-लॅब्यूशानेची पुन्हा दमदार फलंदाजी; ऑस्ट्रेलिया १९७ धावांनी आघाडीवर
कॉमेंट्री करतेवेळी शेन वॉर्नने दिली मार्नस लॅब्यूशानेला शिवी अन् पुढे घडलं असं काही
लायसन्स तर नाय पण गाडी भारी चालवतंय! चिमुकल्याचा ‘हा’ व्हिडिओ सोशलवर हीट