कोरोनाचे संकट असून देखील आयपीएल २०२१चा हंगाम एप्रिल-मे महिन्यात भारतात आयोजित करण्यात आला होता. मात्र हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्याने या हंगामावरचे संकट गहिरे होत होते. काही खेळाडूंनी आणि पंचांनी परिस्थिती पाहून या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय देखील घेतला होता. अखेर बायो बबलचे कवच भेदून आयपीएल मध्येच कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने २९ सामने झाले असतांना हा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
हा हंगाम स्थगित करण्याच्या काही दिवसांपूर्वीच दिल्ली कॅपिटल्सचा ऑफस्पिनर आर अश्विनने माघार घेतली होती. त्यावेळी अश्विनने यामागील कारणाचा खुलासा केला नव्हता. मात्र त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार अश्विनच्या परिवारातील अनेक लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने त्याने माघार घेतली होती. आता नुकताच अश्विनने त्या सगळया घटनाक्रमाबाबत खुलासा केला आहे.
“सलग आठ-नऊ दिवस झोपलो नव्हतो”
आर अश्विन ज्यावेळी आयपीएल मध्ये खेळत होता त्यावेळी त्याच्या परिवारातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर काही दिवस त्याही परिस्थितीत अश्विन स्पर्धा खेळत राहिला होता. मात्र परिस्थिती गंभीर झाल्यावर त्याने आपल्या आप्तस्वकीयांना मदत करण्यासाठी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यादरम्यान नेमकी काय मनस्थिती होती, याबाबत त्याने नुकताच खुलासा केला. आपल्या युट्यूब चॅनेलवर तो बोलत होता.
अश्विन म्हणाला, “मी त्यावेळी जवळपास सलग आठ-नऊ दिवस झोपू शकलो नव्हतो. मला झोपच लागत नव्हती इतके ते दिवस तणावपूर्ण होते. आणि पुरेशी झोप होत नसून देखील मी त्यावेळी सामने खेळत होतो. पण हे करणे खूप कठीण होत गेले. त्यामुळे मी आयपीएल सोडण्याचा निर्णय घेऊन घरी परतलो. खरंतर ज्यावेळी आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मी पुन्हा क्रिकेट खेळेन की याबद्दल देखील विचार करत होतो. पण तरीही मी त्यावेळी तेच केलं, जे गरजेच होतं.”
मात्र आता अश्विनच्या घरी परिस्थिती सुरळीत झाली असून तो भारतीय संघासह इंग्लंड दौर्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यासाठी तो संपूर्ण संघासह मुंबईत जैव सुरक्षित वातावरणात आहे. जैव सुरक्षित वातावरणात राहणे किती कठीण आहे, याबाबत बोलतांना तो म्हणाला, “खरंतर हे खूप कठीण आहे. बाहेरून पाहतांना लोकांना वाटते की आम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतो. पण हे सोपे नाही. आम्हाला इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करायचा आहे. तसेच आमचे दोन दिवसांआड चाचणी देखील होते आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
एकाच वेळी भारताचे तीन दर्जेदार संघ खेळू शकतात, पाकिस्तानच्या दिग्गजाकडून कौतुक
कमिन्सने निवडली वर्ल्ड टेस्ट इलेव्हन; भारताच्या ‘या’ चार खेळाडूंना मिळाले स्थान
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मिळाला नवा सलामीवीर, ७३ ची आहे सरासरी