भारताचा माजी कर्णधार आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड समोर पुन्हा एकदा ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस’ (परस्पर हितसंबंध)चा प्रश्न उभा राहिला आहे. यावेळी हा प्रश्न बंगळुरूमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोट ऍक्सिलन्समध्ये असलेल्या त्याच्या सहभागामुळे निर्माण झाला आहे.
याबद्दल द्रविडने भारतीय क्रिकेट मंडळाला पत्र लिहून त्याची यामध्ये कोणतीही मालकी नसल्याचे कळवले आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, ” द्रविडने स्पष्ट केले आहे की त्या सेंटरला त्याचे नाव देण्यात आले आहे. पण त्याच्याकडे कोणत्याही कंपनीची किंवा या सेंटर मार्फत चालवल्या जाणाऱ्या अकॅडमीचे मालकी हक्क नाही.”
हा प्रश्न प्रशासकीय समितीच्याही समोर आणला आहे. यावर समितीने सांगितले की द्रविडला यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.
बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले, ” यामध्ये द्रविडसाठी कोणतीही समस्या नाही पण कोणत्याही निष्कर्षास येण्याआधी अधिकृत स्पष्टीकरण केलेले कधीही चांगले आहे. जेव्हा लोकपाल नियुक्त केले जाईल तेव्हा ते या प्रश्नावर तोडगा काढतील.”
द्रविडने ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस’ या प्रश्नावर १९ वर्षांखालील संघाबरोबर विश्वचषकासाठी न्यूझीलंडला जाण्याआधी बीसीसीआयला पत्र लिहिले होते. पृथ्वी शॉ कर्णधार असलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघाने द्रविडच्या मार्गदर्शनाखाली ३ फेब्रुवारीला विश्वचषकावर नाव कोरले होते. तसेच द्रविड भारत A संघाचाही प्रशिक्षक आहे.
बंगळुरूमध्ये असलेल्या त्या सेंटरमध्ये भारताचा माजी ऑलंपिक खेळाडू अभिनव बिंद्रा देखील भागीदार आहे. तसेच या सेंटर मध्ये बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, स्क्वॅश,टेनिस आणि स्विमिंग या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
याआधीही द्रविडला ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस’मुळे भारत A संघाचे प्रशिक्षणपद कायम ठेवण्यासाठी आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या प्रशिक्षण पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.