भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिल्या सामन्यात 50 आणि दुसऱ्या सामन्यात 47 धावा केल्या आहेत.
मात्र मागील अनेक महिन्यांपासून त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. तो इंग्लंड, ऑस्ट्रेलिया मालिकेत मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्यातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याचा सहभाग असणारे कॉफी विथ करन हे प्रकरण गाजले.
कॉफी विथ करन या शोमध्ये हार्दिक पंड्या आणि केएल राहुलने केलेल्या विवादात्मक विधानांमुळे त्यांच्यावर बीसीसीआयने काही दिवसांची बंदी घातली होती. त्यामुळे या दोघांनाही ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतावे लागले होते. पण काही दिवसांनी त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली.
त्यानंतर राहुल भारत अ संघाकडून इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळला. यावेळी त्याला भारत अ संघाचा प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडचे मार्गदर्शन मिळाले.
द्रविडच्या मदतीबद्दल बोलताना राहुल म्हणाला, ‘ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून काही काळ मी दूर होतो. त्यामुळे मी परत भारतीय संघात पुनरागमन करु शकलो आणि माझ्यासाठी काय योग्य नाही यावर लक्ष केंद्रीत करु शकलो.
‘सुदैवाने, मला भारत अ संघाबरोबर काही सामने खेळायला मिळाले. ज्या सामन्यात मला दबाव थोडा कमी होते आणि मी माझे लक्ष माझ्या शैलीवर केंद्रीत करु शकलो.’
‘मला राहुल द्रविड बरोबर काही वेळही मिळाला. त्याच्याबरोबर मी माझ्या खेळावर काम केले आणि क्रिकेटवरही चर्चा केली. मी भारत अ संघाकडून खेळलेल्या पाच सामन्यात त्याने मला खूप मदत केली. मी मैदानात घालवलेला वेळही माझ्यासाठी महत्त्वाचा होता. भारतीय संघात परत आल्याने चांगले वाटत आहे.’
त्याचबरोबर राहुल असेही म्हणाला की भारतीय संघाबरोबरील चार-पाच वर्षांच्या अनुभवातून तो क्रिकेट खूप शिकला आहे. तसेच तो क्रिकेटपटू म्हणून उभा राहू शकला आहे. तसेच तो म्हणाला एक व्यक्ती म्हणून तो अजून चांगले वागण्याचा आणि सातत्य राखण्याचा प्रयत्न करणार आहे.
राहुलला आजपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतही संधी देण्यात आली आहे. मात्र आजच्या सामन्यात त्याला अंतिम 11 जणांमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे झाले अनावरण, पहा फोटो
–नक्की भारतीय संघाच्या नव्या जर्सीवर लिहीलंय तरी काय?
–संपुर्ण वेळापत्रक- अशी आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका
–विराट कोहलीला द वाॅल राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी