नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. सामन्यातील पहिले दोन दिवस आघाडीवर असणाऱ्या भारतीय संघासाठी हा पराभव विसरणे निश्चितच अवघड जाणार आहे.
चार कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारतीय संघाने विराट कोहलीच्या 74 धावांच्या खेळीमुळे 244 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघाने केवळ 191 धावांवर रोखत 53 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवली होती. मात्र तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स आणि जॉश हजलेवुड यांनी भेदक मारा करत भारतीय संघाला केवळ 36 धावांवर बाद केले.
शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावत 93 धावा केल्या आणि आठ विकेट राखत सहज विजय मिळवला. भारताच्या या पराभवानंतर क्रिकेट पंडितांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून ,भारताचे माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये मदत करण्यासाठी राहुल द्रविड यांना ऑस्ट्रेलियामध्ये पाठवले गेले पाहिजे असा सल्ला दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना वेंगसरकर म्हणाले ,’ बीसीसीआयने लवकरात लवकर द्रविडला भारतीय फलंदाजांना मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियात पाठवले पाहिजे. द्रविड यांच्यापेक्षा इतर कुठलाही व्यक्ती भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन परिस्थितीत कसे खेळावे याबद्दल योग्य मार्गदर्शन देवू शकत नाही. नेटमध्ये राहुल द्रविड यांची उपस्थिती भारतीय खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल ‘.
वेंगसरकर पुढे म्हणाले,’कोरोना वायरस मुळे एनसीए (राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी) मागील नऊ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे द्रविड यांच्याकडे कुठलेही अतिरिक्त काम नसेल.विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, बीसीसीआय राहुल द्रविड यांना भारतीय संघासोबत पाठवून त्यांचा योग्य वापर करून घेवू शकते ‘.
ऑस्ट्रेलियामधील क्वारंटाईन नियमावली बद्दल बोलताना वेंगसरकर म्हणाले,’ जरी ऑस्ट्रेलियामध्ये १४ दिवसांचा क्वारंटाईन असला तरी राहुल द्रविड, ७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यास सज्ज होतील ‘.
द्रविड यांच्याकडे सध्या राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीचे अध्यक्षपद आहे. पण कोरोनामुळे मागील नऊ महिन्यांपासून राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी बंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! धोनीच्या नेतृत्वात सीएसकेकडून खेळलेल्या खेळाडूची ३२ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती
जडेजाचा हलगर्जीपणा बेतला असता रोहित आणि रहाणेच्या जीवावर; ‘हिटमॅन’चा धक्कादायक खुलासा
दुसऱ्या टी20 विजयानंतर केन विलियम्सन म्हणाला, “पाकिस्तान संघ किती मजबूत, हे माहिती आहे”