दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत रविवारी बहुप्रतिक्षीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. हा सामना पाकिस्तानने १० विकेट्स जिंकत स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. मात्र, भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने संघावर जोरदार टीका केली जात आहे. तसेच अनेकांनी सोशल मीडियावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला निशाणा बनवलं आहे.
विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काही भारतीय चाहते रविवारी प्रचंड संतापलेले दिसले. त्यातच अनेकांनी या सामन्यात महागडा ठरलेल्या मोहम्मद शमीवर सांप्रदायिक व धार्मिक टीका करण्यास सुरुवात केली. शमीवर टीका होत असलेली पाहून भारतील संघातील खेळाडू शमीच्या समर्थनार्थ उतरले. अनेक आजी-माजी खेळाडूंनी शमीला पाठिंबा देत हार-जीत खेळाचाच भाग असल्याचे म्हटले.
दरम्यान, नंतर केवळ खेळाडूच नाही, तर अन्य क्षेत्रातील मान्यवरही शमीच्या बाजूने उभे राहिले. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील शमीला पाठिंबा दर्शवला.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की ‘मोहम्मद शमी आम्ही सर्व तुझ्याबरोबर आहोत. या लोकांमध्ये द्वेष भरलेला आहे, कारण त्यांना कोणी प्रेम देत नाही. त्यांना माफ कर.’
Mohammad #Shami we are all with you.
These people are filled with hate because nobody gives them any love. Forgive them.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 25, 2021
या सामन्यामध्ये मोहम्मद शमीचे गोलंदाजी प्रदर्शन फारसे चांगले राहिले नाही. केवळ त्याचेच नाही, तर अन्य भारतीय गोलंदाजांनाही फारशी चमक दाखवता आली नाही. या सामन्यात भारतीय गोलंदाज पाकिस्तानची एकही विकेट घेण्यात अपयशी ठरले.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने ५७ धावांची खेळी केली. तसेच, रिषभ पंतने ३९ धावांचे योगदान दिले. मात्र, अन्य कोणालाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल १५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाकडून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने अर्धशतकी खेळी केल्या. या दोघांनी मिळून विकेट न गमावता १७.५ षटकात पाकिस्तानला १५२ धावसंख्या गाठून दिली. बाबर आझमने नाबाद ६८ धावांची आणि रिझवानने नाबाद ७९ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
स्कॉटलंड नाचले मुजीबच्या तालावर! पाच बळी मिळवत रचले विक्रमच विक्रम