जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलचा चौदावा हंगाम ४ मे रोजी अचानकपणे स्थगित करण्यात आलेला. काही खेळाडू, प्रशिक्षक व कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा निर्णय घेतलेला. त्यानंतर, शनिवारी (२९ मे) बीसीसीआय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली व या बैठकीत आयपीएलचे उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत खेळविण्यात येतील, असे ठरले. या बातमीनंतर क्रिकेटप्रेमी व सहभागी संघांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, राजस्थान रॉयल्सने एक मजेदार व्हिडिओ शेअर करत या निर्णयाचे स्वागत केले.
राजस्थान रॉयल्सने शेअर केला व्हिडिओ
आयपीएल २०२१ पुन्हा सुरू होणार ही बातमी समजल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी पोस्ट करत या निर्णयाचे स्वागत केले. नेहमीच आपल्या गंमतीदार सोशल मीडिया पोस्टसाठी प्रसिद्ध असणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर हातावरून असाच एक मजेदार व्हिडिओ पोस्ट करण्यात आला.
सदर व्हिडिओमध्ये राजस्थान रॉयल्सचे खेळाडू आयपीएलचे आतुरतेने वाट पाहतात असे दाखवण्यात आले आणि आयपीएल होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर हे खेळाडू नाच-गाणे करत आहेत असे दाखवले. एका प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपटातील गाणे वापरून त्या गाण्यातील खऱ्या नायकांना राजस्थानच्या खेळाडूंचे मुखवटे घालून नाचवताना दाखवले गेले. या खेळाडूंमध्ये कर्णधार संजू सॅमसन, जोस बटलर, राहुल तेवतिया व ख्रिस मॉरिस या खेळाडूंचे चेहरे दिसत आहेत. अगदी अल्पावधीतच या पोस्टला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.
Wait, what? 🤔🙊😂#HallaBol | #RoyalsFamily | #IPL2021 pic.twitter.com/63GIT4BGAp
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2021
अशी राहिली राजस्थानची कामगिरी
आयपीएलच्या पहिल्या हंगामात विजेतेपद मिळविणाऱ्या राजस्थानला त्यानंतर अशी कामगिरी करता आली नाही. आयपीएल २०२१ थांबवली गेली तेव्हा राजस्थान संघ ७ सामने खेळून त्यापैकी ३ सामन्यात विजय संपादन करत गुणतालिकेत सहाव्या स्थानी विराजमान होता. राजस्थानकडून आतापर्यंत या हंगामात दोन शतके ठोकली गेली आहेत. यामध्ये कर्णधार संजू सॅमसन व जोस बटलर यांचा समावेश आहे. हंगामातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या ख्रिस मॉरिसने संघासाठी सर्वाधिक १४ बळी मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषकात सर्वाधिक धावा करत या ३ भारतीयांनी जिंकली होती ‘गोल्डन बॅट’
कमालच की! ‘या’ १० गोलंदाजांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही टाकला नाही वाईड बॉल
ताबडतोड फलंदाजी! वनडेमध्ये सर्वात जलद शतक करणारे ३ भारतीय क्रिकेटर