ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ चेंडू छेडछाडी प्रकरणावरून चांगलाच संकटात सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून चेंडू छेडछाडीच्या लाजिरवाणा प्रकार करण्यात आला होता. या प्रकारामुळे स्मिथने कर्णधारपद सोडावे अशा मागणीने जोर धरला होता.
अखेर स्मिथला काही वेळेपूर्वीच ऑस्ट्रलिया संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. ही बातमी येऊन काही वेळच झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. स्मिथला राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघाच्या कर्णधार पदावरूनही काढून टाकण्याची बातमी आहे.
दोन वर्षाच्या बंदीनंतर राजस्थान ७ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या मोसमात पुनरागमन करणार आहे. यावर्षी त्यांनी स्मिथला कर्णधार म्हणून घोषित केले होते. पण आता स्मिथ चेंडू छेडछाडी प्रकरणात अडकल्यानंतर त्याला राजस्थानच्या कर्णधारपदावरूनही डच्चू मिळाल्याची शक्यता आहे. अजूनतरी राजस्थान संघाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट या दोघांनीही काल चेंडूंबरोबर छेडछाड केल्याचे मान्य केले होते. त्यामुळे या दोघांवर तसेच ऑस्ट्रेलिया संघावर सर्वच स्थरातून जोरदार टीका झाली आहे.
यावर्षी राजस्थानने स्मिथ या एकमेव खेळाडूला संघात लिलावाधी कायम ठेवले होते. त्यानंतर त्यांनी अजिंक्य राहणेला राईट टू मॅच कार्ड वापरून कायम ठेवले होते. स्मिथने २०१४-१५ मध्येही राजस्थानचे नेतृत्व केले होते.
तसेच मागील वर्षी आयपीएलमध्ये स्मिथ रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचाही कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली पुण्याचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. पण अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्स संघाकडून १ धावेने पराभव स्वीकारावा लागला होता.