मुंबई । रविवारी(27 सप्टेंबर) आयपीएलच्या 9 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा रोमांचक सामन्यात पराभव केला. शारजाहच्या पाटा खेळपट्टीवर किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 223 धावांची मोठी धावसंख्या उभारली, प्रत्युत्तरात राजस्थान संघाने 19.3 षटकांत 6 विकेट्स गमावून लक्ष्य साध्य केले. या विजयासह राजस्थानने त्यांचे सलग दोन सामने जिंकले, तर किंग्ज इलेव्हन पंजाबचा हा तीन सामन्यांमधील दुसरा पराभव होता. एक वेळ अशी होती की, किंग्ज इलेव्हन पंजाबने हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण राजस्थानच्या फलंदाजांनी दाखवलेल्या आक्रमकतेमुळे त्यांनी सामना जिंकला.
विशेष म्हणजे राजस्थानने आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम यावेळी नोंदवला. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी ऐतिहासिक ठरला. राजस्थान रॉयल्सच्या विजयाची पाच मोठी कारणे जाणून घेऊया.
1. संजू सॅमसनच्या वादळी खेळीने राजस्थान रॉयल्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामन्यात तग धरून राहिली. जोपर्यंत संजू सॅमसन क्रीजवर होता तोपर्यंत त्याने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. सॅमसनने 42 चेंडूत 85 धावा केल्या, त्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त होता. सॅमसनने त्याच्या खेळीत 7 षटकार आणि 4 चौकार लगावले. संजू सॅमसनने दुसर्या विकेटसाठी राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ सोबत 81 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि तिसर्या विकेटसाठी राहुल तेवतियाबरोबर 61 धावांची भागीदारी केली. या 2 भागीदाऱ्या आणि सॅमसनचे अर्धशतक हे संघाच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले. अर्धशतकाच्या उत्कृष्ट खेळीसाठी सॅमसनला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.
2. 18 व्या षटकात राहुल तेवतियाच्या फटकेबाजीने राजस्थान रॉयल्ससाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला. शेवटच्या 3 षटकांत राजस्थानच्या संघाला 51 धावांची आवश्यकता होती. यानंतर तेवतियाने शेल्डन कॉट्रोलसारख्या गोलंदाजाच्या षटकात एक-दोन नव्हे तर तब्बल पाच षटकार लगावले. राहुल तेवटियाने कॉट्रोलच्या चेंडूवर मैदानाच्या प्रत्येक बाजूने षटकार खेचले. या षटकात एकूण 30 धावा केल्या आणि त्यानंतर राजस्थानने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून हातून विजय खेचून आणला.
3. राजस्थान रॉयल्सच्या विजयात कर्णधार स्टीव्ह स्मिथने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्मिथ नेहमी त्याच्या डावात थोडा वेळ घेतो, पण 224 धावांचे विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना स्मिथने आपल्या शैलीत खेळत 27 चेंडूत 50 धावा केल्या. अर्धशतक करताना स्मिथने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्याने सॅमसनबरोबर महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करून राजस्थानच्या विजयाचा पाया रचला.
4. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजाचे खराब टप्प्यावर गोलंदाजी करणे हे राजस्थान रॉयल्सच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले. शारजाहची विकेट पाटा होती हे खरे, पण शेवटच्या षटकात कॉट्रोल आणि शमीने यॉर्करऐवजी लेंग्थ चेंडू टाकले. परिणामी तेवतियाने कॉट्रेलच्या एका षटकात 5 षटकार ठोकले, तर शमीलाही 19 व्या षटकात 3 षटकार लगावले.
5. कर्णधार म्हणून केएल राहुलचा हा आयपीएलचा पहिला हंगाम आहे, परंतु तो क्रिकेटच्या मैदानावर ज्येष्ठ खेळाडू आहे. केएल राहुलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध कर्णधार म्हणून अनेक चूका केल्या, याचा परिणाम म्हणून पंजाबला सामना गमवावा लागला. केएल राहुलने शेवटच्या सामन्यात तीन बळी घेणार्या एम अश्विनला केवळ 9 चेंडू फेकण्यास दिले, ग्लेन मॅक्सवेलला दोन षटके दिल्यानंतर त्याने त्याला आणखी एक षटक टाकण्यास दिले, ज्यामध्ये संजू सॅमसनने 21 धावा फटकावल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने पंजाबला सामन्यात परत येण्याची संधी दिली नाही.