भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Womens Cricket Team) न्यूझीलंड येथील महिला क्रिकेट विश्वचषकातील मोहीम साखळी फेरीत संपुष्टात आली. अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेकडून निसटता पराभव झाला. भारतीय संघ नूकताच मायदेशी परतला. संघ मायदेशी परतल्यानंतर बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे की, संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार (Ramesh Powar) यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.
पोवार यांचा कार्यकाळ संपुष्टात
वनडे विश्वचषकानंतर रमेश पोवार यांचा महिला संघासोबतचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपणार होता. आता पुन्हा प्रशिक्षक व्हायचे असल्यास त्यांना पुन्हा एकदा अर्ज करावा लागेल. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोवार यांना सीएसीच्या नियमानुसार पुन्हा एकदा प्रशिक्षक पदासाठी अर्ज करावा लागेल. पोवार यांनी डब्ल्यू वी रमन यांची जागा घेतली होती. रमन यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने २०२० टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारलेली. तसेच, पोवार व कर्णधार मिताली राज यांच्यातील वादही समोर आले होते.
पुन्हा मिळणार का जबाबदारी?
पोवार यांना ही जबाबदारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. न्यूझीलंडमध्ये भारतीय संघात दुफळी निर्माण झाल्याची बातमी समोर आली होती. यामध्ये प्रशिक्षक म्हणून पोवार यांनी हस्तक्षेप केला तसेच संघाला त्यांच्या मार्गदर्शनात अनेक पराभवांना सामोरे जावे लागले. सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेले व्हिव्हीएस लक्ष्मण पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे महिला संघाला मजबूत बनवू इच्छित आहेत. त्यासाठी ते एक मॉडेल बनवतायेत. संघाला पुढील वर्षी टी२० विश्वचषकात भाग घ्यायचा आहे. तत्पूर्वी एक मजबूत संघ बनवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंची जागा भरून काढणार्या खेळाडू त्यांना शोधाव्या लागतील. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-