बंगाल विरुद्ध विदर्भ संघात चालू असलेल्या रणजी सामन्यात पहिल्याच दिवशी विदर्भाकडून दोन शतके करण्यात आली. दिवसाखेर विदर्भाने १ बाद २८५ धावा केल्या.
या सामन्यात बंगाल संघाचा कर्णधार मनोज तिवारीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय फोल ठरवत विदर्भाच्या दोन्हीही सलामीवीरांनी शतके केली. फेझ फेझलने २३२ चेंडूंत १४२ धावा केल्या. यात त्याने २२ चौकार मारले. अखेर बंगालचा गोलंदाज अशोक दिंडाने त्याला पायचीत करून बाद केले.
विदर्भाचा दुसरा सलामीवीर संजय रामास्वामी हा २३८ चेंडूत ११७ धावा करून नाबाद आहे. त्याने या खेळीत आत्तापर्यंत १४ चौकार मारले आहेत. फेझल आणि रामास्वामी यांनी २५९ धावांची भागीदारी केली. तसेच या सामन्यात रामास्वामी बरोबर वासिम जफर १८ धावांवर नाबाद आहे.
उद्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ १ बाद २८५ धावांपासून पुढे खेळतील.