आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर झाला आहे. यासह रवी शास्त्री यांचा देखील मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला. या स्पर्धेनंतर ते आपले पद सोडणार होते. त्यांच्या जागी राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघाची साथ सोडल्यानंतर रवी शास्त्री काय करणार? हा प्रश्न सर्वंनाच पडला असेल. आगामी आयपीएल स्पर्धेत प्रशिक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतात.
रवी शास्त्रींसह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा देखील प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला आहे. दरम्यान आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अशी माहिती समोर येत आहे की, अहमदाबाद फ्रॅंचाईजीचे मालक सीव्हीसी कॅपिटलने रवी शास्त्री,आर श्रीधर आणि भरत अरुण यांना संपर्क केला होता. परंतु याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. ज्यावेळी त्यांनी संपर्क केला होता. त्यावेळी हे तिघेही आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत व्यस्त होते.
सीव्हीसी कॅपिटलने खरेदी केला अहमदाबाद संघ
सीव्हीसी कॅपिटल जगभरातील क्रीडा स्पर्धांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखली जाते. यापूर्वी ते फॉर्म्युला १ चे मालक होते. तर अलीकडेच त्यांनी ला लिगा स्पर्धेत देखील गुंतवणूक केली होती. सीव्हीसी कॅपिटलच्या मालकीच्या अहमदाबाद संघाचे सामने हे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहेत. नुकताच या स्टेडियमचे नामकरण करून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. तसेच हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे.
रवी शास्त्री यांनी २०१७ मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर भारतीय संघाने मायदेशात आणि परदेशात देखील अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी आणि २०२१ मध्ये झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. तसेच सलग दोन वेळेस भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केले होते.