भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामन्याची सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेल्या या सामन्यात पाहुणा इंग्लंड संघ नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत आहे. दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह घरच्या मैदानावर आपला पहिला कसोटी सामना खेळत आहे. या विशेष सामन्यातील पहिल्याच चेंडूवर बुमराहला ‘ड्रीम डेब्यू’ करण्याची सुवर्णसंधी होती. परंतु यष्टीरक्षक रिषभ पंत याच्यामुळे ही संधी त्याच्या हातून निसटली.
झाले असे की, इंग्लंडच्या पहिल्या डावातील पहिले षटक अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने टाकले. त्यानंतर बुमराह या सामन्यातील आपले पहिले षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स याने फाइन लेगला शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून मागील दिशेने यष्टीकडे गेला.
यावेळी यष्टीमागे उभा असलेल्या पंतने चेंडू झेलण्यासाठी डाइव्ह मारली. परंतु तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्याच्या हातून झेल सुटला. यासह बुमराहची मायभूमीतील पहिल्या चेंडूवरची पहिली विकेटही हुकली.
डॅनियल लॉरेन्स ठरला भारतातील पहिली विकेट
बुमरहाने जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आजवर बुमराहने एकूण १७ कसोटी सामन्यात ७९ विकेट्स घेतल्या आहेत. परंतु यातील सर्व सामने परदेशात झाल्याने भारतातील मैदानांवरील एकाही कसोटी विकेटची त्याच्या खात्यात नोंद नव्हती. अशात घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामन्यातील पहिल्या चेंडूवर विकेट घेत ड्रीम डेब्यू करण्याची बुमराहला संधी होती.
अखेर डावातील २५.४ षटकात बुमराहने इंग्लंडचा फलंदाज डॅनियल लॉरेन्सला शून्य धावांवर पायचित केले. यासह लॉरेन्स हा मायभूमीतील बुमराहची पहिली विकेट ठरला आहे. सोबतच कसोटी कारकिर्दीतील ८० वा शिकार ठरला आहे.
विराट कोहलीची रिषभ पंतला पसंती
भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (४ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेमध्ये पंतला चेन्नई कसोटी सहभागी करण्याबाबत माहिती दिली होती. तो म्हणाला होता की, ‘रिषभ पंत चेन्नई कसोटीचा भाग असेल. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना प्रभाव पाडला आहे आणि तो चांगल्या लयीत आहे. त्यामुळे आम्हाला त्याला कायम ठेवायचे आहे. त्याने आयपीएलनंतर चांगली कामगिरी केली असून त्याने त्याच्या फिटनेसवर आणि त्याच्या खेळावर काम केले आहे. त्याला चांगले खेळताना पाहून आनंद झाला आहे.’
महत्त्वाच्या बातम्या-
आजवर अनेकांच्या दांड्या गुल केल्या पण आजची ‘ही’ विकेट बुमराह कधीच विसरणार नाही; वाचा कारण