नुकतीच देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील एक सामना शनिवारी (१६ जानेवारी) आसाम विरुद्ध बंगाल संघात झाला. या सामन्यात युवा फलंदाज रियान पराग याने आसाम संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे सांभाळली. यासह त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
रियान हा टी२० स्पर्धेतील एखाद्या संघाचे नेतृत्त्वपद सांभाळणारा २१व्या शतकात जन्मलेला पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. १० नोव्हेंबर २००१ रोजी आसामच्या गुवाहाटी शहरात त्याचा जन्म झाला होता. सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेतील आसाम संघाचे नेतृत्त्व करत त्याने हा किर्तीमान मिळवला आहे.
एवढेच नव्हे तर, रियान प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा २१व्या शतकात जन्मलेला पहिला भारतीय क्रिकेटपटूही आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये आसाम संघाकडून खेळताना हैदराबादविरुद्ध त्याने प्रथम श्रेणी पदार्पण केले होते.
पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी
रियानच्या सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेतील पहिल्या सामन्याविषयी बोलायचे झाले तर, आपल्या नेतृत्त्वाखाली त्याने संघाला पहिलाच सामना जिंकून दिला आहे. बंगालविरुद्ध झालेल्या या सामन्यात आसाम संघाने १३ धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान रियानने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्रथम फलंदाजी करताना १४व्या षटकापर्यंत आसाम संघ ३ बाद ९८ धावांवर होता. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत रियानने आतिशी फलंदाजी करत अर्धशतकापार धाव केल्या. ५४ चेंडूत १४२.४९ च्या स्ट्राईक रेटने ७७ धावांची तडाखेबंद खेळी त्याने केली. दरम्यान ५ षटकार आणि ५ चौकार ठोकले. यामुळे आसाम संघाने बंगालपुढे १५८ धावांचे तगडे आव्हान उभारले.
प्रत्युत्तरात बंगालचे फलंदाज २० षटकात ८ विकेट्स गमावत केवळ १४४ धावाच करु शकला. परिणामत: आसामने १३ धावांनी सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
एकविसाव्या वर्षी मुलाचे पदार्पण, तर तेच वय असतांना वडिलांच्या नावे होते ‘हे’ विक्रम; पाहा आकडेवारी
सईद मुश्ताक अली ट्रॉफी : आजपर्यंत कोणालाच न जमलेला रेकॉर्ड केलाय बडोद्याच्या ‘या’ क्रिकेटरने
सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुनचे मुंबई संघाकडून पदार्पण; बाप-लेकाच्या नावावर झाला खास रेकॉर्ड