इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नाव काढताच सर्वप्रथम डोक्यात एमएस धोनी याचे नाव येते. ४ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाच्या या कर्णधाराचा चाहतावर्ग फार मोठा आहे. यादरम्यान सीएसकेचा खेळाडू रॉबिन उथप्पा याने धोनीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल २०२१ मध्ये (IPL) सीएसकेने (CSK) उथप्पाला (Robin Uthappa) आपल्या संघात सहभागी केले होते. यानंतर धोनीसोबतच्या प्रसंगाबद्दल बोलताना उथप्पा म्हणाला की, तो धोनीला (MS Dhoni) माही भाई म्हणावे की आणखी काय म्हणावे?, यावरून खूप गोंधळला होता.
शेयरचॅटवर बोलताना उथप्पा म्हणाला की, “जेव्हा मला सीएसके संघात निवडले गेले होते, तेव्हा मी १३-१४ वर्षांनंतर माहीसोबत खेळणार होतो. जेव्हा मी सीएसके संघात गेलो होतो, तेव्हा सगळेजण त्याला माही भाई किंवा माही सर म्हणून आवाज देत होते. त्यामुळे मी थोडा भ्रमित झालो होतो. एके दिवशी मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारले की, मी तुला माही म्हणून की माही भाई?”
“यावर त्याने मला म्हटले होते की, गोष्टी जास्त अवघड बनवू नको. तुला जे वाटेल ते म्हण. मी तोच व्यक्ती आहे, ज्याला तू काही वर्षांपूर्वी भेटला होता. मी बदललेलो नाही. त्यानंतर मी त्याला माही म्हणायला सुरू केले होते. सीएसके संघात मी एकटाच असा व्यक्ती होतो, जो त्याला माही म्हणत होता,” असेही उथप्पा पुढे म्हणाला.