इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या चौदाव्या हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. आयपीएलच्या सर्व संघांनी रिटेन आणि रिलीजच्या प्रक्रियेनंतर आपापसात खेळाडू ट्रेड केले होते. त्यानंतर नुकताच आयपीएलचा मिनी लिलावही पार पडला आहे. अशात आयपीएलपुर्वी देशांतर्गत पातळीवर चालू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेद्वारे भारतीय खेळाडूंना जय्यत तयारी करण्याची संधी मिळाली आहे. यंदा एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये सहभागी झालेला रॉबिन उथप्पाही या संधीचा पूरेपुर लाभ घेताना दिसत आहे.
यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या ३५ वर्षीय उथप्पाला चेन्नईने राजस्थान रॉयल्समधून ट्रेड करत आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे. याच उथप्पाने शनिवारी (२० फेब्रुवारी) केरळ विरुद्ध ओडिसा संघात झालेल्या सामन्यात शतक करत संघाला स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकून दिला आहे.
प्रथम फलंदाजी करताना ओडिसा संघाने ८ बाद २५८ ही धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात केरळ संघाकडून सलामीला फलंदाजीला येत उथप्पाने १०७ धावांची अफलातून खेळी केली. या खेळासाठी त्याने अवघ्या ८५ चेंडूंचा सामना केला आणि ४ षटकार व १० चौकार मारले. त्याच्या या कामगिरीमुळे केरळने ३४ धावांनी सामना खिशात घातला.
साल २००८ पासून सातत्याने आयपीएलमध्ये खेळत असलेल्या उथप्पाची कामगिरी पाहता सीएसकेला त्याच्याकडून फार अपेक्षा असणार आहेत. १८९ आयपीएल सामन्यांचा अनुभव लक्षात घेता धोनीने त्याला ट्रेड करत सीएसकेत सामील केले होते. अशात आयपीएल २०२१ मध्ये दमदार पुनरागमन करत सीएसकेला चौथे जेतेपद जिंकून देण्यासाठी उथप्पा कसे सहकार्य करेल?, यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.
आयपीएल २०२१ साठीचा चेन्नई सुपर किंग्स संघ
लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा.
लिलावात खरेदी केलेले खेळाडू –
कृष्णप्पा गौतम (९.२५ कोटी), मोईन अली (७ कोटी), चेतेश्वर पुजारा (५० लाख), के भागवथ वर्मा (२० लाख), सी हरी निशांथ (२० लाख), एम हरिशंकर रेड्डी (२० लाख)
महत्त्वाच्या बातम्या-