ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(१५ जानेवारी) चौथा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर लगेचच बाद झाला. त्यामुळे त्याचे अर्धशतकही हुकले. तो नॅथन लायनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताचा संघ शनिवारी(१६ जानेवारी) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात फलंदाजीला उतरला. भारताकडून पहिल्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुबमन गिलने केली. मात्र भारताला पहिला झटका लवकर बसला. शुबमन गिल ७ व्या षटकात ७ धावा करुन बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने चेतेश्वर पुजाराच्या मदतीने डावाला आकार देण्यास सुरुवात केली होती.
रोहित ज्या लयीत खेळत होता ते पाहून अनेकांना वाटत होते की आता तो मोठी धावसंख्या उभारेल. पण याचवेळी २० व्या षटकात नॅथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू गोलंदाजीला आला. आपला कारकिर्दीतील १०० वा सामना खेळत असलेल्या लायनने या षटकातील ५ व्या चेंडूला फ्लाईट दिली. हे पाहून रोहितने पायांचा वापर करत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्यांच्या बॅटच्या खालच्या बाजूला लागला आणि वर उडाला. त्यावेळी लॉन्ग ऑनला मिशेल स्टार्कने तो चेंडू सुरेखरित्या झेलला. त्यामुळे रोहितला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
रोहितने ७४ चेंडूत ४४ धावा केल्या. यात ६ चौकारांचा समावेश आहे.
Nathan Lyon's 397th Test wicket seemed to come out of nowhere and the Aussies were pumped! #OhWhatAFeeling #AUSvIND | @Toyota_Aus pic.twitter.com/rIhl4ZjbTu
— cricket.com.au (@cricketcomau) January 16, 2021
रोहित बाद झाल्यानंतर भारताचा डाव कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला. दुसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र संपल्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे तिसऱ्या सत्रात खेळ देखील रद्द झाला. दुसऱ्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात २ बाद ६२ धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लॅब्यूशेनने २०४ चेंडूत १०८ धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार टीम पेनने ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. यासह मॅथ्यू वेड (४५) आणि कॅमेरॉन ग्रीन (४७) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी चॅम्पियनशिप : फॅब फोरसह आत्तापर्यंत ‘या’ फलंदाजांनी केलीत द्विशतके
शुबमन गिल बॅटवरचे स्टिकर सिडनीतच विसरला? पाहा नक्की काय आहे प्रकरण