टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. ‘हिटमॅन’ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड कसोटीतही सपशेल फ्लॉप झाला. तो दोन्ही डावात दुहेरी धावांचा आकडाही गाठू शकला नाही.
शनिवारी दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहितला ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं बोल्ड केलं. तो 15 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. रोहितनं लेन्थ बॉल समजण्यात चुकी केली आणि कमिन्सनं त्याचे स्टम्प उडवले. तो क्रिजवर आल्यापासूनच चाचपडताना दिसत होता. रोहित पहिल्या डावात 23 चेंडूत 3 धावा करून बाद झाला होता. तेव्हा त्याला स्कॉट बोलंडनं एलबीडब्ल्यू आऊट केलं होतं.
रोहित सहसा सलामीवीर म्हणून खेळतो. मात्र पहिल्या कसोटीत राहुलनं या क्रमांकावर चांगली फलंदाजी केल्यामुळे रोहितनं त्याला ही जागा कायम ठेवू दिली. ॲडलेड कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजाली येवूनही रोहितचं नशीब बदललं नाही. रोहित त्याच्या कारकिर्दीत सहाव्यांदा कसोटीच्या दोन्ही डावात एकेरी धावसंख्येवर बाद झाला. तो कसोटीत गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या खेळीसाठी संघर्ष करत आहे. रोहितनं मार्च 2024 पासून कसोटी शतक झळकावलेलं नाही.
ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं रोहितची विकेट घेतली. कमिन्सविरुद्ध रोहितचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. रोहितनं आतापर्यंत 11 कसोटी डावांमध्ये कमिन्सचा सामना केला. यामध्ये त्यानं 120 धावा केल्या असून तो पाच वेळा बाद झाला आहे.
रोहित शर्माचा बोल्ड होण्याचा रेकॉर्ड पाहून तर तुम्हाला धक्काच बसेल! रोहितनं 2013 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2013 ते 2022 या कालावधीत कसोटीच्या 77 डावांत तो केवळ 11 वेळा बोल्ड झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांत या आकडेवारीत आश्चर्यकारक वाढ झाली आहे. 2022 ते 2024 या दरम्यान 36 कसोटी डावांमध्ये रोहित 11 वेळा बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
हेही वाचा –
भारतीय संघ पराभवाच्या गर्तेत, दुसऱ्या दिवशीही फलंदाजी फ्लॉप
कमबॅकसाठी तयार भारताचा घातक गोलंदाज! बुमराहच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार
टीम इंडियासाठी चिंतेची बातमी! जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त होऊन मैदानावरच बसला