भारतीय संघाचा टी२० विश्वचषकातील प्रवास संपला असून संघ आगामी मालिकेच्या तयारीत आहे. १७ नोव्हेंबर पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मायदेशातील टी२० आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. अशातच आता अशी माहिती समोर येत आहे की, रोहित शर्माला पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार केले जाऊ शकते. तसेच अजिंक्य रहाणे उपकर्णधाराच्या रूपात कायम असेल.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्ताप्रमाणे विराट कोहलीला न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाणार आहे. अशात रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधाराची भूमिका पार पडेल. विराट मालिकेत दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा संघासोबत सामील होईल.
दरम्यान, रहाणेसाठी हा धक्का मानला जात आहे. कारण, गेल्या काही वर्षापासून रहाणे कसोटी संघाचे उपकर्णधारपद सांभाळत आहे. तसेच, विराटच्या अनुपस्थितीत त्यानेच प्रभारी कर्णधारपदाची जबाबदारीही अनेकदा सांभाळली आहे. पण, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याला विराटच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची संधी मिळणार नसल्याची चर्चा आहे.
टी२० मालिकेसाठी रोहित कर्णधार
दरम्यान, मंगळवारी (९ नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या मालिकेदरम्यान विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा अशा काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच या मालिकेपूर्वीच विराटने टी२० संघाचे नेतृत्त्व सोडले आहे. त्यामुळे आता भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. याशिवाय केएल राहुलला उपकर्णधार करण्यात आले आहे.
याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून हार्दिक पंड्याला संघातून वगळण्यात आले आहे. तसेच अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थिती या टी२० मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हर्षल पटेल, अवेश खान, ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर अशा काही खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय श्रेयस अय्यर, दीपक चाहर, युजवेंद्र चहल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तर आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले आहे.
न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिका १७ नोव्हेंबरपासून खेळली जाणार असून न्यूझीलंड संघ विश्वचषक संपल्यानंतर लगेच भारत दौऱ्यावर येणार आहे. टी२० मालिकेतील सामने जयपूर, कोलकाता आणि रांची या तीन शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. तर कसोटी मालिका मुंबई आणि कानपूर या दोन शहरांमध्ये खेळले जाणार आहेत.
असा आहे न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-न्यूझीलंड सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहायचा असेल, तर पाळावे लागतील ‘हे’ कठोर नियम
टी२० विश्वचषकादरम्यान कर्णधार विराटने घेतलेले ‘हे’ ३ निर्णय भारतीय संघासाठी पडले महागात
‘चाहत्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आम्ही दुप्पट मेहनत करू’, हार्दिक पंड्याने दिले आश्वासन