भारतीय क्रिकेट संघाने नुकताच इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये भारताला एकमेव कसोटीत पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी२० व वनडे मालिका आपल्या नावे केल्या. भारतीय संघाच्या या यशानंतर सर्व स्तरातून खेळाडूंचे कौतुक केले जात आहे. मात्र, संघाचा कर्णधार रोहित शर्मा हाच या विजयानंतरही खुश नाही. त्याला अजूनही आपल्या संघामध्ये काही कमतरता दिसत आहेत.
भारतीय संघाने मिळवला ऐतिहासिक विजय
टी२० मालिकेत भारतीय संघाने इंग्लंडला सहजरित्या पराभूत केले होते. मात्र, वनडे मालिका काहीशी चुरशीची झाली. पहिल्या सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. मँचेस्टर येथील अखेरच्या सामन्यात २६० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना, हार्दिक पंड्या व रिषभ पंत यांनी शानदार खेळ करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. रिषभने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक या सामन्यात झळकावले. भारतीय संघाने आठ वर्षानंतर इंग्लंडमध्ये वनडे मालिका आपल्या नावे केली.
भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,
“या निकालानंतर आम्ही खुश आहोत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आम्हाला जे काही येथे मिळवायचे होते ते आम्ही मिळवले. पुढे जाऊन आम्हाला काही क्षेत्रांमध्ये नक्कीच सुधारणा करावी लागेल. मधल्या फळीतील फलंदाजांना जास्त फलंदाजीची संधी मिळत नसायची. मात्र, यावेळी हार्दिक व रिषभ यांनी मिळालेली संधी साधली.”
रोहितने यावेळी प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहलचे भरपूर कौतुक केले. तो म्हणाला,
“चहल संघाचा महत्वपूर्ण सदस्य आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करू शकतो. तो मागील विश्वचषकात संघाचा भाग नव्हता हे दुःखद होते. मात्र, त्यानंतर त्याने जे पुनरागमन केले ते कौतुक करणे योग्य आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यातील पाच पराक्रम, जे टीम इंडियाला बनवतील टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन
ENGvsIND: रिषभ पंतच्या त्या ‘थम्स अप’ इशाऱ्यामागचे रहस्य अखेर उलगडले, व्हिडिओ जोरदार व्हायरल
युवकांना संधी, कसोटीवर लक्ष, भावूक संदेश देत बेन स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा