चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली. या मालिकेतील चेन्नई येथे होत असलेला पहिला सामना इंग्लंडचा कर्णधार जो रुटसाठी खुप खास ठरला आहे. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना आहे. याबरोबरच त्याने खास विक्रम केला आहे.
पदार्पणही भारतातच
रुटसाठी भारत हा नेहमीच खास देश राहिला आहे. रुटचे कसोटी पदार्पण देखील भारतात झाले आहे. त्याने नागपूर येथे सन २०१२ ला १३ ते १७ डिसेंबर दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्याचे पदार्पणही धडाक्यात झाले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच पहिल्या डावात ७३ आणि दुसऱ्या डावात नाबाद २० धावा केल्या होत्या.
त्यानंतर रुटने त्याचा कारकिर्दीतील ५० वा कसोटी सामना देखील भारतातच विशाखापट्टणम येथे २०१६ साली खेळला. त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात ५३ आणि दुसऱ्या डावात २५ धावा केल्या होत्या.
त्यामुळे रुट हा मायदेशाबाहेर जाऊन एकाच देशात पहिला, पंन्नासावा आणि शंभरावा कसोटी सामना खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
तसेच मायदेशाबाहेर जाऊन एकाच देशात पहिला आणि शंभरावा कसोटी सामना खेळणारा तो एकूण तिसरा क्रिकेटपटू आहे. याआधी असा पराक्रम भारताच्या कपिल देव, वेस्ट इंडिजच्या कार्ल हुपर यांनी केला आहे. कपिल देव यांनी पाकिस्तानात पहिला आणि शंभरावा कसोटी सामना खेळला होता. तर हुपर यांनी भारतात पहिला आणि शंभरावा कसोटी सामना खेळला होता.
The captain walks out for the toss in his 100th Test match for England! 🏴
Live Scorecard: https://t.co/gEBlUSOuYe#INDvENG pic.twitter.com/RV5zgyFZf7
— England Cricket (@englandcricket) February 5, 2021
रुटची भारताविरुद्ध कामगिरी –
रुटने भारताविरुद्ध आत्तापर्यंत १६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४ शतके आणि ९ अर्धशतकांसह ५६.८४ च्या सरासरीने १४२१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या १६ सामन्यांपैकी ६ सामने त्याने भारतात खेळले आहेत. त्यात त्याने ५३.०९ च्या सरासरीने ५८४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या करू मैं मर जाऊ! कुलदीपला चेन्नई कसोटीत संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव
धोनी आणि सचिनच्या उपस्थितीतील ‘तो’ सामना अविस्मरणीय – जो रूट
विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी ४ वर्षापासून तरसतोय ‘हा’ इंग्लंडचा गोलंदाज, पाहा कशी राहिली कामगिरी