देशांतर्गत क्रिकेट मधील सर्वात मोठी टी२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सर्व राज्य संघटनांनी आपापल्या संघाची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, तमिळनाडू व कर्नाटक या मोठ्या संघांनंतर आता महाराष्ट्राने देखील या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला असून, इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामात सर्वाधिक धावा काढत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर, अष्टपैलू नौशाद शेख संघाचा उपकर्णधार असेल.
या दिवशी सुरू होणार स्पर्धा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात ४ नोव्हेंबर रोजी होईल. महाराष्ट्राचा समावेश एलिट ए गटामध्ये असून, महाराष्ट्राचा पहिला सामना तामिळनाडूशी होईल. या गटातील सर्व सामने लखनौ येथील इकाना स्टेडियमवर होणार आहेत. ऋतुराजला संघाचा कर्णधार बनविण्यात आले असले तरी, आयपीएल दरम्यान केकेआरसाठी खेळणारा राहुल त्रिपाठी दुखापतीतून अजूनही सावरला नसल्याने संघाचा भाग नाही.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी संघ निवडीबाबत बोलताना म्हटले,
“ऋतुराज संघाचा कर्णधार असेल तर, नौशादकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल त्रिपाठी अद्यापही दुखापतीतून बरा झाला नाही. त्यामुळे त्याचा संघ निवडीसाठी विचार झाला नाही. त्याव्यतिरिक्त सिद्धेश विर व राहुल हंगरगेकर निवडीसाठी उपलब्ध नाहीत.”
या संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव याचीदेखील निवड केली गेली आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा संघ-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नौशाद शेख (उपकर्णधार), केदार जाधव, अझीम काझी, यश नहर, रणजीत निकम, सत्यजित बच्छाव, तरणजीत सिंग, मुकेश चौधरी, आशय पालकर, मनोज इंगळे, प्रदीप दाढे, शमशुज्मा काझी, स्वप्निल फुलपगार, दिव्यांग हिंगणेकर, सुनील यादव, धनराज परदेशी, स्वप्नील गुगळे, जगदिश झोपे व पवन शाह.
महत्त्वाच्या बातम्या-
‘फॅनबॉय मोमेंट’! युवा पाकिस्तानी गोलंदाज धोनीला भेटून झाला भावूक
सबका बदला लेगा माही! आयपीएलमध्ये रंगणार चेन्नई विरुद्ध लखनौचे नवे द्वंद; ‘हे’ आहे कारण
मेगा लिलाव, नवीन संघ, स्पर्धेचे स्वरूप आणखी खूप काही; जाणून घ्या आयपीएल २०२२ मध्ये काय बदल होणार?