भारत आणि इंग्लंड संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू असलेल्या या सामन्यात पाहुण्या इंग्लंडचे सलामीवीर फलंदाजी करत आहेत. पहिल्या १५ षटकापर्यंत बिनबाद ३५ धावा झाल्या आहेत. या सामन्यापुर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने कसोटी मालिकेविषयी भविष्यवाणी केली आहे. त्याने अपेक्षा केली आहे की, भारतीय संघ मायभूमीतील या कसोटी मालिकेत विजयी होईल.
भारतच कसोटी मालिका जिंकेल- सचिन
यासंदर्भात बोलताना सचिन म्हणाला की, “दोन्ही संघांनी आपापल्या मागील कसोटी मालिका जिंकल्या आहेत. आत्मविश्वासाने भरलेले हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. परंतु इंग्लंडच्या तुलनेत भारतीय संघाचे संतुलन जास्त मजबूत आहे. या दोन्ही संघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. तरीही भारतच या कसोटी मालिकेत विजयी पताका झळकावेल असे मला वाटते.”
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाची केली प्रशंसा
सचिनने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऑस्ट्रेलियाला २-१ ने कसोटी मालिकेत पराभूत करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली. तो म्हणाला की, “हा अतिशय रोमांचक विजय होता. यापुर्वी जेव्हा आम्ही रहाणेच्या नेतृत्त्व शैलीची चर्चा केली होती. तेव्हा कुणालाही माहिती नव्हते की, अखेरच्या तीन सामन्यात भारताचे एवढे खेळाडू दुखापतग्रस्त होती. याव्यतिरिक्त भारतीय संघावर एवढी संकटे ओढवली. पण त्यांनी धैर्याने त्यांचा सामना केला आणि जेतेपद मिळवले. हे सर्व खरोखरच खूप अविश्वसणीय होते.”
“तो मेलबर्न कसोटी सामनाच होता, जिथून याची सुरुवात झाली होती. ऍडलेड कसोटीत भारतीय संघ ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे पुढील ३ सामन्यात भारतीय संघ काही करू शकेल का अपयशाने खचून जाईल?, असे सर्वांना वाटत होते. परंतु पुढे मेलबर्न कसोटीद्वारे भारताने मालिकेत पुनरागमन केले. पुढील सिडनी कसोटी अनिर्णीत राखली आणि ब्रिस्बेन कसोटीत मोठ्या कमालीचा विजय मिळवला,” असे शेवटी बोलताना सचिन म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
क्या करू मैं मर जाऊ! कुलदीपला चेन्नई कसोटीत संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव
धोनी आणि सचिनच्या उपस्थितीतील ‘तो’ सामना अविस्मरणीय – जो रूट