यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारतीय संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिल्या डावात आघाडी मिळवूनही दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर गारद झाला होता.
परंतु या सामन्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारताने दुसरा कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील सांघिक कामगिरीसह भारताने ८ विकेट्सने ऑस्ट्रेलियावर मात केली. यानंतर रहाणे आणि कोहली यांच्या नेतृत्त्वाची तुलना केली जाऊ लागली आहे. परंतु मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला त्यांची तुलना करणे अजिबात आवडलेले नाही.
सचिन तेंडूलकरचे वक्तव्य
याविषयी पीटीआयशी बोलताना सचिन म्हणाला की, “लोकांनी रहाणे आणि कोहली यांची तुलना करू नये. रहाणेचे व्यक्तिमत्त्व कोहलीपेक्षा खूप वेगळे आहे. बॉक्सिंग डे कसोटीत त्याचा हेतू आक्रमक फलंदाजी करण्याचा होता. मला सर्वांना आठवण करून द्यायची आहे की, रहाणे आणि कोहली हे दोघेही भारतीय आहेत आणि ते भारतीय संघाकडून क्रिकेट खेळतात. कोणताही व्यक्ती भारत देशापेक्षा जास्त मोठा नाही. आपला क्रिकेट संघ आणि देश यांच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कुणीही नाही.”
कोहली आणि रहाणेची कसोटी सामन्यांतील आकडेवारी
ऍडलेड येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना झाला होता. या दिवसरात्र सामन्यातील पहिल्या डावात कर्णधार कोहली चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत होता. मात्र रहाणेच्या चुकीमुळे तो ८ चौकारांच्या मदतीने ७४ धावा करत धावबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात अवघ्या ४ धावांवर त्याने आपली विकेट गमावली. त्यानंतर पालकत्त्व रजा घेऊन तो मायदेशी परतला.
पुढे मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रहाणेच्या हातात संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे होती. या सामन्यातील पहिल्या डावात रहाणेने १२ चौकारांच्या मदतीने ११२ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावातही २७ धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
अरर..!! चाहत्याने भरलेलं ‘ते’ बिल भारतीय क्रिकेटर्सच्या आलं अंगलट; पंतच्या चूकीचा होणार तपास
लॅब्यूशानेने घेतला भारतीय गोलंदाजांचा धसका, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सावध राहण्याचा केला इशारा
‘तो’ क्रिकेटर म्हणजे भारताचा भविष्यातील स्टार गोलंदाज, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले नाव