डेहराडून: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्या नाशिकच्या साईराज परदेशी याने वेटलिफ्टिंग मधील 81 किलो गटात कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील त्याचे पहिलेच पदक होय. एक आठवड्यापूर्वी तापाने आजारी असलेल्या आणि पाठीतील दुखण्याने त्रस्त असलेल्या साईराज याने आज येथे आत्मविश्वासाने कौशल्य दाखविले. साईराज या 17 वर्षीय खेळाडूने स्नॅचमध्ये 141 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 170 किलो असे एकूण 311 किलो वजन उचलले.
मध्यप्रदेशच्या व्ही. अजय बाबू याने 322 किलो तर पश्चिम बंगालच्या अचिंता शेऊली याने 313 किलो वजन उचलून अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्यपदकाची कमाई केली.
साईराज याने डिसेंबर महिन्यात झालेल्या कनिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. येथेही त्याला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र एक आठवड्यापूर्वी त्याला ताप आला होता तसेच पाठीतही उसण भरली होती. त्यामुळे येथे तो सहभागी होईल की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. तथापि पतियाळा येथे राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात (एनसीओई) सराव करणार्या साईराज याला तेथील प्रशिक्षक अल्केश बारूआ यांनी जमेल तसा प्रयत्न करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कामगिरी करावी असा सल्ला दिला. त्यामुळेच तो येथे सहभागी झाला आणि महाराष्ट्राच्या खात्यात त्याने आणखी एका पदकाची भर घातली. साईराजने खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा, विविध वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत.
“आजारपणामुळे या स्पर्धेत सहभागी होईल की नाही याबाबत साशंक होतो तथापि माझे प्रशिक्षक अल्केश बारूआ यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी येथे सहभागी झालो आणि कांस्यपदकापर्यंत पोहोचलो. हे कास्यपदक माझ्यासाठी आगामी करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.” असे साईराज याने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
2025च्या आयपीएल हंगामात रिंकू सिंहच्या नावावर होणार ‘हे’ 3 खास रेकाॅर्ड
चॅम्पियन्स ट्राॅफीत रोहित-विराट घालणार धुमाकूळ, प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया
शाब्बास..! स्मृती मानधनानं घडवला इतिहास, चौथ्यांदा जिंकला बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार