आयपीएल २०२२ साठी आरसीबीने केली मुख्य प्रशिक्षकाची घोषणा; विजेतेपद जिंकण्याचा केला निर्धार
भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील हंगामात संजय बांगर आरसीबी संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. आरसीबी फ्रँचायझीने आपल्या ट्विटर हँडलवर याची अधिकृत घोषणा केली आहे.
मुख्य प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांच्या नियुक्तीची माहिती देणारे निवेदन आरसीबीने जारी केले आहे. आपल्या निवेदनात आरसीबीने म्हटले आहे की, ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आगामी हंगामासाठी संजय बांगर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बांगर हे माईक हेसनच्या जागी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. माईक हेसन हे क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक म्हणून कायम राहणार आहेत.’ आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात हेसन यांनी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती.
संजय बांगर यांनी स्वतःची आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यापूर्वी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते म्हणाले, ‘एवढ्या मोठ्या फ्रँचायझीचा मुख्य प्रशिक्षक होण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. मी संघातील अनेक महान आणि प्रतिभावान खेळाडूंसोबत काम केले आहे आणि आरसीबीला पुढे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे आणि त्यामुळे बरेच काम करणे बाकी आहे. पण मला खात्री आहे की, व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफच्या मदतीने आम्ही जगभरातील आमच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर परत आनंद आणू. या मेगा लिलावाबाबत आम्ही आमची रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. मी सर्व आरसीबी चाहत्यांना हे आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही एक मजबूत संघ तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आयपीएल चषक जिंकू इच्छितो.’ आरसीबी संघ आतापर्यंत एकदाही आयपीएल विजेता होऊ शकलो नाही.