पुणे | पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) पदार्पणात ठिकाण म्हणून रॅलीची पंढरी फिनलंड, तर नॅव्हीगेटर म्हणून गिनेस बुकमधील विक्रमवीर नॅव्हीगेटर असा दुहेरी योग साधला आहे.
फिनलंडमधील जायवस्कीला परिसरात या रॅलीची गुरुवारी रेकी झाली. या मालिकेतील तिसऱ्या श्रेणीच्या (डब्ल्यूआरसी 3) मालिकेत संजय भाग घेईल. टू व्हाई ड्राईव्ह कारचा हा गट आहे. बाल्टिक मोटरस्पोर्टस प्रमोशनने सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा आर2 कार तो चालवेल.
संजयने रेकीच्या अनुभवाविषयी सांगितले की, आशिया-पॅसिफिक रॅली मालिकेत (एपीआरसी) आम्ही रेकीसाठी वेगळी कार वापरतो. डब्ल्यूआरसीसाठी मात्र प्रशिक्षक-मेंटॉर ग्रॅहॅम मिडीलटन यांच्या सल्यानुसार मी फोर्ड फिएस्टा आर2 ही नेहमीसारखीच कार वापरली. रॅलीची कार वेगळी असली तरी तीच कार रेकीसाठी वापरणे संयुक्तिक आणि उपयुक्त ठरेल अशी त्यांची भूमिका होती. डब्ल्यूआरसीचे वेळापत्रक अगदी भरगच्च असते. मला केवळ पाच तास झोपायला म्हणजे खरे तर तेवढाच ब्रेक असेल.
गिनेस विक्रमवीर नॅव्हीगेटर
गॅरॉडने येथे येण्यापूर्वी रुमानियात गिनेस बुक विक्रम केला. ब्रिटनच्या मार्क हिगीन्स याच्या साथीत त्याने ही कामगिरी केली. याविषयी संजयने माहिती दिली. त्याने सांगितले की, या जोडीने सुबारू डब्ल्यूआरएक्स एसटीआय कारसह जे काही केले ते ऐकून मी थक्क झालो. 52.4 मैल अंतराच्या मार्गावर तब्बल 624 वक्र भाग होते. तीव्र चढाचा मार्ग 1607 फुटांपासून 6699 फुटांपर्यंत वाढत होता. हवामानाची साथ त्यांना मिळालीच नाही, उलट पाऊस आणि धुक्यामुळे काही ठिकाणी कोरडा, तर काही ठिकाणी ओला भाग होता. अशा मार्गावर साधी कार ताशी कमाल 25 मैल वेगाने जाऊ शकते, पण या जोडीने 40 मिनिटे 58.8 सेकंद वेळेत हा टप्पा पूर्ण केला. त्यांनी ताशी 76.69 मैल वेग राखला.
पहिला नोंदणीकृत स्पर्धक
संजय या गटात सहभागी होणारा पहिला अधिकृत नोंदणीकृत भारतीय स्पर्धक असेल. संजयने सांगितले की, टू-व्हील ड्राईव्ह गटात मी एपीआरसी मालिकेत प्रॉडक्शन करंडक जिंकला. डब्ल्यूआरसी मध्ये मी टू व्हील ड्राईव्ह गटातच भाग घेईन, पण येथील स्पर्धेची पातळी फार वरची आहे. 23 स्पेशल स्टेजेसचे एकूण अंतर 317 किलोमीटर 26 मीटर असेल. एकूण वाहतुकीचा मार्ग धरून तब्बल दीड हजार किलोमीटरच्या घरात ड्रायव्हिंग करावे लागेल. येथे उन्हाळा असल्यामुळे हवामान कोरडे राहील. बारीक खडीचा मार्ग वेगवान असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–मुंबई शहराचे कबड्डी पंच शिबीर यशस्वी
–टीम इंडियात लवकरच पदार्पण करणार नवा रोहित शर्मा!