पुणे | पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले थायलंडमधील टीडब्ल्यूसी क्रॉस कंट्री रॅलीने मोसमाचा प्रारंभ करेल. ऐतिहासिक कांचनाबुरी प्रांतात ही रॅली होईल.
चार महिन्यांपूर्वी संजयने दक्षिण थायलंडमधील याच प्रांतात रॅलीने गतमोसमाची सांगता केली होती. संजयने गतवर्षी जागतिक रॅली मालिकेतील डब्ल्यूआरसी 3 गटात भाग घेतला. यात सहभागी झालेला तो पहिला नोंदणीकृत भारतीय ड्रायव्हर ठरला. फिनलंडमधील जायवस्किला प्रांतातील रॅलीत त्याने भाग घेतला.
संजयने सांगितले की, मी नव्या मोसमात कोणत्याही पूर्ण मालिकेत भाग घ्यायचे अद्याप ठरविलेले नाही, पण स्पर्धात्मक सरावात राहणे केव्हाही चांगले असते. त्यासाठी थायलंडपेक्षा दुसरे चांगले ठिकाण असू शकत नाही. यंदाही मी फिनलंड रॅलीत सहभागी होईन. तेथील वाळूचा मार्ग विलक्षण वेगवान आहे. याशिवाय युरोपीय रॅली मालिकेतील एक-दोन फेऱ्यांमध्येही माझा सहभाग असेल.
संजय बँकॉकमध्ये दाखल झाला आहे. तो डेलो स्पोर्ट टीमने सुसज्ज केलेली नवी इसुझू युटीलीटी कार चालवेल. यावेळी त्याचा नॅव्हीगेटर नवा असेल. गेल्या वर्षी त्याने चार फेऱ्यांच्या थायलंड रॅली मालिकेत थान्याफात मिनील याच्या साथीत भाग घेतला होता. तेव्हा संजयला एक रॅली पूर्ण करता आली नव्हती, पण त्याने मिनीलला नॅव्हीगेटर म्हणून साथ दिली. उरलेल्या फेऱ्यांत त्याने भाग घेतला. त्यामुळे मिनील नॅव्हीगेटरचे विजेतेपद मिळवू शकला.
आता इत्तीपोन सिमाराक्स हा नॅव्हीगेटर असेल. तो चियांग माईचा रहिवासी आहे. त्याने जपानच्या ताकुमा अओकी याला नॅव्हीगेटर म्हणून साथ दिली आहे. ताकुमा आधी मोटो जीपी रायडर होता. क्रॅशमध्ये त्याचे दोन्ही पाय गेले. त्यानंतर ताकुमा रॅलीकडे वळला.
संजयने नव्या नॅव्हीगेटरविषयी सांगितले की, इत्तीपोनने आशियाई क्रॉस कंट्री रॅलीत ताकुमाला साथ दिली आहे. त्याला थायलंडमधील मार्गाची चांगली माहिती आहे. तो माझ्यासाठी उपयुक्त ठरेल. ताकुमाला मी बरेच वेळा भेटलो आहे. त्याची खेळावरील निष्ठा थक्क करणारी आहे. पाय नसले तरी तो अॅक्सीलरेटर, ब्रेक, क्लच हातांनी ऑपरेट करतो. ताकुमा हा होंडा संघात मीक डुहानचा सहकारी होता.
या रॅलीला शनिवारी दुपारी निशाण दाखविले जाईल. बहुतांश टप्पे रविवारी पार पडतील.