पुणे | दिनांक 19 जुलै : आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील माजी विजेता संजय टकले जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. रॅलीची पंढरी मानल्या जाणाऱ्या फिनलंडमध्ये तो पदार्पण करेल. या विभागात नोंदणीकृत ड्रायव्हर म्हणून सहभागी होणारा तो महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा पहिलाच स्पर्धक ठरेल. ही रॅली 26 ते 29 जुलै दरम्यान फिनलंडमधील जायवस्कीला येथील वेगवान मार्गावर होईल.
याविषयी संजयने गुरुवारी (19 जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. संजय डब्ल्यूआरसी 3 विभागात सहभागी होईल. ब्रिटनचा डॅरेन गॅरॉड त्याचा नॅव्हीगेटर असेल. तो बाल्टीक मोटरस्पोर्टस प्रमोशनने सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा आर 2 ही कार चालवेल.
फिनलंड रॅलीविषयी क्रिकेटमध्ये लॉर्डस, टेनिसमध्ये विंबल्डन, यानुसार रॅलीत फिनलंडचा उल्लेख केला जातो. मार्गाचे स्वरुप टणक आणि रुंद, तसेच तांत्रिक भागांतील मार्ग मात्र अरुंद असल्यामुळे ही रॅली स्पर्धकांचे कौशल्य, एकाग्रता आणि दमसास पणास लावते.
पोटात गोळा आणणाऱ्या असंख्य जम्प फिनलंड रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे जोरदार जम्प. या जम्प पोटात गोळा आणणाऱ्या असतात. यातील औनीनपोजा स्टेज डब्ल्यूआरसी जगतात प्रसिद्ध आहे. यावेळी काकारिस्टो येथील स्टेजमध्ये हा मार्ग समाविष्ट आहे. याशिवाव लौक आणि रुहीमाकी या स्टेजेसमध्ये मोठ्या जम्प्स आहेत.
रविवारी सुद्धा जोरदार जम्प्सचे आव्हान असेल. यात रुहीमाकी येथील स्टेजला टीव्ही पॉवर स्टेज असे नाव देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत तेथे शेकडाऊनची स्टेज व्हायची. यावेळी या स्टेजचा संयोजकांनी रॅलीच्या मार्गात समावेश केला आहे. त्यात पारंपरिक मार्गाचाही समावेश आहे.
मोटोक्रॉसचा अनुभव उपयुक्त जम्प्सच्या आव्हानाविषयी संजयने सांगितले की, वेग खुपच जास्त असल्यास कारचे वायुगतीशास्त्र (एरोडायनॅमिक्स) लागू होते. परिणामी कारचा मागील भाग खाली, तर पुढील भाग वर जातो. अशावेळी जम्पसाठी टेक-ऑफ करताना ब्रेकींग आणि त्यानंतर वेग कमाल वाढविणे (फुल थ्रॉटल) योग्य ठरते.
प्रेस नोट्स महत्त्व वेगवान मार्गाच्या रॅलीत पेस नोट््सला कमालीचे महत्त्व असते. आतापर्यंत एपीआरसी पातळीवर संजयचे नॅव्हीगेटर्स तपशीलवार पेस नोट्स काढायचे. त्यामुळे कॉल्सची संख्या जास्त असायची. आता वेगवान मार्गामुळे कॉल्स कमी करणे क्रमप्राप्त ठरते. याबद्दल संजयने सांगितले की, डाव्या आणि उजव्या वळणांची तीव्रता, चढ किंवा उताराचे स्वरुप, सरळ मार्ग असल्यास त्याचे वर्णन, मार्गावरील वाळू, माती किंवा खडीचे प्रमाण यानुसार रेकीच्या वेळी पेस नोट्स काढल्या जातात. तीव्रतेनुसार त्याला क्रमांक दिले जातात. त्याशिवाय अनेक ठिकाणी सावध ड्रायव्हिंग करणे आवश्यक असते. त्यास कॉशन म्हणतात. या कॉशनलाही क्रमांक दिले जातात. जेवढे क्रमांक जास्त तेवढे कॉल्स जास्त होतात. डब्ल्यूआरसीमध्ये मात्र वेगवान मार्गामुळे इतके कॉल्स देण्यास नॅव्हीगेटरला आणि ते ऐकून कार चालवायला ड्रायव्हरना वेळ नसतो. साहजिकच पेस नोट्सचे स्वरुप बदलण्यात आले. मिडीलटन यांच्या सुचनेनुसार इस्टोनिया आणि लॅट्विया येथील रॅलींमध्ये मी त्यानुसारच ड्रायव्हिंग केले. मी दोन्ही रॅली पूर्ण करू शकलो. त्यामुळे मला मोलाचा अनुभव मिळाला आहे. वेगवान मार्गामुळे तसेच संक्षिप्त पेसनोट्समुळे एखाद्या सेकंदाची चुकही महागात पडू शकते. मार्गात अनेक ठिकाणी उंचवटे असतात. प्रामुख्याने ते वळणांवर असतात. तेथे जाताना पुढील मार्ग दिसत नसतो. अशा ठिकाणांना क्रेस्ट असे संबोधले जाते. त्याच्या पुढेही वळण असू शकते. त्यामुळे टेक-ऑफपूर्वी कारची पोझीशन अचूक ठवावी लागते. त्यामुळे कमाल वेग साधता येतो.
रॅलीचा कार्यक्रम
– गुरुवारी वेसाला येथे चार किलोमीटर 26 मीटरच्या मार्गावर शेकडाऊन
– रात्री मध्य जायवस्कीला परिसरातली हार्जू स्ट्रीटवर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने आकर्षक तसेच संमिश्र स्वरुपाच्या मार्गावरील पहिल्या स्टेजसर पहिला लेग पुर्ण
– शुक्रवारी मोक्सी, युरीआ, असामाकी, अनेकोस्की, या परिसरातील अनेक नव्या मार्गांवर प्रत्येकी दोन स्टेजेस. ओट्टीला व हार्जू येथे प्रत्येकी एक अशा एकूण दहा स्टेजेस
– पहिल्या लेगचे एकूण अंतर 128.68 किलोमीटर शनिवार ( 28 जुलै) पैजाला, पिहालाजाकोस्की, काकारिस्टो, टुओहीकोटानन या चार ठिकाणी प्रत्येकी दोन अशा एकूण आठ स्टेजेस
– एकूण अंतर 142.86 किलोमीटर
रविवार (ता. 29 जुलै)
– लौका, रुहिमाकी येथे प्रत्येकी दोन अशा एकूण चार स्टेजेस तिसऱ्या लेगचे एकूण अंतर 45.72 किलोमीटर
-रॅलीचे एकूण अंतर 317.26 किमी
महत्त्वाच्या बातम्या-