डेहराडून: उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी 6 पदकांची लयलुट केली. सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता संकेत सरगर, सांगलीची दिपाली गुरसाळे, पुण्याच्या सारिका शिनगारे व नाशिकच्या मुकुंद आहेरने रूपेरी यशाचे वजन पेलले. लातूरच्या आकाश गौड व पुण्याचा शुभम तोडकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली.
15 दिवसांपूर्वी गुडघ्याला व स्नायूला मोठ्या प्रमाणात दुखापती होऊनही सांगली जिल्ह्याची खेळाडू दिपाली गुरसाळे हिने या दुखापतीवर मानसिक तंदुरुस्ती भक्कम ठेवीत मात करीत वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक पटकाविले. दिपाली हिने 45 किलो गटातील स्नॅचमध्ये 69 किलो तर क्लीन व जर्क मध्ये 82 किलो असे एकूण 151 किलो वचन उचलले. केरळच्या सुफना जस्मिन हिने अनुक्रमे 72 व 87 असे एकूण 159 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.
पुरुषांच्या 61 किलो गटात महाराष्ट्राच्या सांगलीचा राष्टकुल पदक विजेता संकेत सरगर याने स्नॅच मध्ये 117 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 142 किलो असे एकूण 259 किलो वजन उचलले आणि रौप्य पदक जिंकले. त्याचाच सहकारी पुण्याचा शुभम तोडकर याने कांस्यपदक पटकाविले. त्याने स्नॅच मध्ये 114 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 254 किलो वजन उचलले. राष्टकुल स्पर्र्धेत हुकलेले सुवर्णपदक आता जिंकयचे असल्याचे संकेत सरगर यांनी सांगितले.
पुरुष गटातील 55 किलो गटात महाराष्ट्राच्या मुकुंद आहेर व आकाश गौड यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. मुकुंद आहेर याने स्नॅच मध्ये 112 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 135 असे एकूण 247 किलो वजन उचलले. आकाश गौड याने मध्ये 107 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 137 असे एकूण 244 किलो वजन उचलले.
पुण्याजवळील राजगुरूनगरमधील सारिका शिनगारे हिने महिलांच्या 49 किलो गटात रुपेरी यश संपादन केले. तिने स्नॅचमध्ये 79 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 100 असे एकूण 179 किलो वजन उचलले. छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने अनुक्रमे 85 व 106 असे एकूण 191 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. 26 वर्षीय सारिका रेल्वेची खेळाडू असून पुण्यातील वडगाव मावळ येथे अनिकेत निवघणे यांच्याकडून प्रशिक्षण घेते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे.
महिलांच्या 45 किलो गटातील दिपाली हिने गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्नॅचमध्ये 75 किलो व एकूणचा 164 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. यंदाही तिला राष्ट्रीय विक्रमाची अपेक्षा होती, मात्र 15 दिवसांपूर्वी सराव करताना तिच्या गुडघ्यावर आणि स्नायूंची मोठी दुखापत झाली. त्यामुळे आपली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संधी मुकणार की काय? अशी शंका तिला निर्माण झाली. मात्र, तिचे प्रशिक्षक संतोष सिंहासने यांनी तिला मानसिक आधार दिला, त्यामुळे तिने 15 दिवस जमेल तसा सराव करत येथील स्पर्धेत भाग घेतला आणि महाराष्ट्राला आणखी एक रौप्यपदकाची कमाई करून दिली.
मुकुंद हा 21 वर्षीय खेळाडू रेल्वेमध्ये नोकरी करीत असून गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. तो मनमाड येथे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याच्या मेघा व वीणाताई या दोन बहिणींही राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडू आहेत. मुकुंदचे यश पहाण्यासाठी त्याचे आजोबा एकनाथ, आजी गंगुबाई, आई इंदुबाई व वडिल संतोष आहेर डेहराडून आले होतेे. लाडक्या लेकाचे पदक पाहून सर्व कुटुंबियाचे डोळे आनंदाने पाणावले होते. आता मला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे असल्याने मुकुंद यांने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी या दिवशी भारतीय संघ दुबईला रवाना होणार, स्पर्धेपूर्वी टीम इंडियाबाबत मोठे अपडेट्स समोर
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, कर्णधारांचे फोटोशूट रद्द! मोठे कारण समोर
मुंबई इंडियन्सनं सहावा संघ विकत घेतला! अंबानी कुटुंब इंग्लंडमध्ये आपला झेंडा फडकवण्यास सज्ज