सेंच्युरियन। उद्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात शेवटचा आणि सहावा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. या वनडे मालिकेत भारताने आधीच ४-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
भारताचा उद्याचा सामना जिंकून मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखण्याचा प्रयत्न असेल तर यजमान दक्षिण आफ्रिका प्रतिष्ठेसाठी खेळतील. भारताने पाचव्या वनडे सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
याबद्दल विराट म्हणाला आहे की, ” इतिहास रचण्याची भावना खूप मस्त आहे.” तसेच विराटने पुढचा सामनाही जिकंण्याचाच इरादा असेल सांगताना म्हटले आहे की “आम्हाला ५-१ ने मालिकेत विजय मिळवायचा आहे पण आम्ही त्याचबरोबर बाकी खेळाडूंनाही संधी देण्याची शक्यता आहे.”
१६ जणांच्या संघातील मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक,मनीष पांडे, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर यांना अजून एकदाही या मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे यांच्यापैकी खेळाडू उद्या खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह मागील काही सामन्यातून सातत्याने खेळत असल्याने उद्याच्या सामन्यात मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरला संधी मिळू शकते. तसेच दिनेश कार्तिक आणि मनीष पांडेला मधल्या फळीत संधी मिळण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण मालिकेत भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. विराट आणि शिखर धवन आत्तापर्यंत या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये खेळले आहेत. तसेच रोहित शर्मानेही मागील सामन्यात शतकी खेळी करून तोही फॉर्ममध्ये आल्याचे सांगितले आहे.
गोलंदाजीमध्येही चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोघांनी आक्रमक गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला रोखले आहे. या मालिकेत आत्तापर्यंत या दोघांनी मिळून २९ विकेट्स घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका मात्र फलंदाजीमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. एबी डिव्हिलियर्सने चौथ्या सामन्यातून संघात पुनरागमन केले. पण त्यालाही गेल्या दोन्ही सामन्यात चांगला खेळ करता आला नाही. तसेच बाकी फलंदाजांनाही खास काही करता आलेले नाही.
भारतीय संघाने आज विश्रांती घेणेच पसंत केले आहे. कारण ही वनडे मालिका संपल्यानंतर लगेचच १८ फेब्रुवारीपासून टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन,अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल, श्रेयश अय्यर, दिनेश कार्तिक,मनीष पांडे, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर.
दक्षिण आफ्रिका संघ: एडिन मार्करम(कर्णधार), हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहीर, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मोर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरीस, लुंगीसानी एन्गिडी,अँडिल फेहलूकवयो, कागिसो रबाडा, ताब्राईझ शम्सी, खाया झोन्डो, फरहान बेहार्डीन.